धरण उशाला, कोरड घशाला!

१ ते २ कि.मी. पाण्यासाठी महिलांची भटकंती

ठाणेः शहापूर धरणांचा तालुका. ‘धरण उशाला, कोरड घशाला' असे म्हणण्याची वेळ या तालुवयावर आली आहे. शहापूर तालुवयातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु आहे. पाडा परिसरात पाणीच नसल्याने पाण्यासाठी  महिलांना १ ते २ कि.मी. दूरवर डोवयावर हंडे घेऊन पायपीट करावी लागत आहे. त्याच्या निषेधार्थ ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आंदोलन छेडण्याचा इशारा ‘श्रमजीवी संघटना'ने शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिला आहे.

अप्पर वैतरणा धरण  गावाच्या कुशीत आहे. त्यातील पाणी मुंबईला जीवन देते; पण त्या धरणाच्या सावलीत जगणाऱ्या महिलांना मात्र थेंबभर पाणी मिळत नाही. डोळ्यांसमोर पाणी साठलेले दिसते. पण, ते पिण्यासाठी मिळत नाही अशी अवस्था केवळ अन्यायकारक नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ‘जल जीवन योजना'चे काम सुरु होऊन ५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही आजपर्यंत एकाही आदिवासी पाड्याला पाणी मिळालेले नाही. भावली धरणातून पाणी येईल का, कधी येईल, याची कोणालाच माहिती नाही. मात्र, महिलांच्या डोक्यावर रोज १ ते २ किलोमीटर दूरुन हंडे उचलण्याचे ओझे मात्र नक्की टाकले गेले आहे. ते ओझे पाण्याचे नाही, तर शासनाच्या असंवेदनशीलतेचे आहे, असा आरोप ‘श्रमजीवी'ने केला आहे.

गावठा, तेलमवाडी, ढुबाचीवाडी, कातवारवाडी, हिवाळवाडी, कोळ्याचीवाडी, शिदवाडी, भेंडीचीवाडी  भगतवाडी, बौध्दवाडा, खडकवाडी, आघाणवाडी, खरंब्याचीवाडी, चिंचवाडी, पाणोटा, निरगुडवाडी, कवट्याचीवाडी, दऱ्याचीवाडी अशा साडेतीन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पाड्यांमध्ये महिलांचे आयुष्य पाण्यासाठीच्या संघर्षातच संपत आहे. पाणी मिळवताना त्यांचे आरोग्य हरवत आहे, सन्मान हरवत आहे आणि आयुष्य झिजत आहे. पुरुष रोजगारासाठी शहराकडे जातात. मागे राहिलेल्या महिला, लहान मुले आणि वयोवृध्द यांचे जीवन पाण्याच्या प्रतिक्षेत अडकून पडले आहे. मुलांचे शिक्षणात पाण्यामुळे अडचणी निर्माण होत आहे, महिलांचे आरोग्य ढासळले आहे  आणि संपूर्ण गावांचा विकास थांबून गेला आहे. सदर परिस्थिती म्हणजे सरकार महिलांचा सन्मान राखत नाही, याचा जिवंत पुरावा आहे.

‘जागतिक महिला दिन'च्या दिवशी महिलांचा सन्मान भाषणांतून नव्हे, तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवून दाखवला गेला पाहिजे. पाणी न देणे म्हणजे महिलांचा अपमान, वेदना आणि गुलामगिरीच्या जीवनात ढकलणे होय. सदर बाब संविधानिक मूल्यांना धरुन नाही. या अन्यायाविरोधात ‘श्रमजीवी'च्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.  

तहानेला अंत नाही, हीच मोठी शोकांतिका...
‘भारतीय संविधान'ने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत विहिगाव अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पाड्यांमधील वास्तव पाहिले तर संविधान आमच्यासाठी केवळ कागदावरच उरले आहे, अशी वेदनादायी भावना निर्माण होते. पिढ्यान्‌पिढ्या आमची माणसे तहानलेली आहेत आणि या तहानेला अंत नाही, हीच आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे ‘श्रमजीवी'चे शहापूर तालुका अध्यक्ष मालू हुमणे, सचिव  प्रकाश खोडका यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्रीन ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता २ सुवर्ण पुरस्कारांचा बहुमान