ग्रीन ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता २ सुवर्ण पुरस्कारांचा बहुमान

नवी मुंबई : विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मानांकित असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेस पथदिवे (स्ट्रीट लाईटींग) आणि इव्ही चार्जींग स्टेशन्स या दोन उपक्रमांकरिता हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारा राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण  पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी २ दोन उपक्रमांकरिता हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण पुरस्कार प्राप्त करणारी नवी मुंबई देशातील एकमेव शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मानांकित झाली.

दिल्ली येथे ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार स्विकारले. याप्रसंगी उपअभियंता संतोष मोरासकर उपस्थित होते.

सदर पुरस्काराबद्दल महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसेच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि डेलोईट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौदावा ग्रीन एनर्जी समिट व सहावा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार सोहळा ४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे डिझायर सभागृहात संपन्न झाला.

हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील या पुरस्कारांची श्रेणी, प्रश्नावली व मूल्यांकन पद्धती ऊर्जा क्षेत्रातील अत्यंत अनुभवी व मान्यवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली होती. पुरस्कारांचे मूल्यांकन अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने काटेकोर आणि पारदर्शक प्रक्रियेव्दारे करण्यात आले.

        तपासणीच्या पहिल्या टप्प्यात ऊर्जा बचत अक्षय ऊर्जेचा वापर, जीएचजी उत्सर्जन कपात, गुंतवणूक, परतावा, प्रमाणपत्रे, पुरस्कार व मान्यता या निकषांचा विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे दुस-या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये नवोन्मेष (Innovation), धोरणात्मक दृष्टिकोन, प्रत्यक्ष अंमलबजावणी व  शाश्वततेवरील प्रभाव यांचा सखोल अभ्यास करून पहिल्या टप्प्यासाठी 75 टक्के तर दुस-या टप्प्यासाठी 25 टक्के गुण प्रमाण ठरवून अंतिम गुण निश्चित देण्यात आले. या दोन्ही टप्प्यांतील एकत्रित गुणांच्या आधारे विजेते घोषित करण्यात आले.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे माजी सचिव तथा आयसीसी उर्जा विषयक नॅशनल एक्स्पर्ट समितीचे अध्यक्ष अनिल रझदान होते. तसेच समिती सदस्य म्हणून सोलर एनर्जी कॉर्पो. ऑफ इं. लि. माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलॅटरी कमिशनचे माजी अध्यक्ष गिरीश प्रधान, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲथओरिटीच्या माजी अध्यक्ष निरजा माथूर, द ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पिपल अँड प्लॅनेटचे उपाध्यक्ष सौरभ कुमार या मान्यवर तज्ज्ञांनी सखोल परीक्षण केले.

नवी मुंबई महापालिकेची ऊर्जा कार्यक्षम एलईडी स्ट्रीट लाईटींग, सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईटींग व्यवस्था या उपक्रमास एक राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण  पुरस्कार आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जींग पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण  पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील दोन सुवर्ण पुरस्कार पटकाविणारी नवी मुंबई महापालिका देशातील एकमेव शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

नवी मुंबई महापालिका अंदाजित 18.5 लाख नागरिकांना विद्युत सेवा देणारे नियोजित शहरांपैकी एक शहर असून, साधारणत: 95 मेगावॅट ऊर्जा मागणी व्यवस्थापित करत आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेच्या हरित ऊर्जा धोरणांना, ऊर्जा कार्यक्षम अंमलबजावणीला, शाश्वत व हवामानपूरक शहर विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.

नवी मुंबई महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कारांचा लाभलेला हा बहुमान महापालिकेच्या नागरिक-केंद्रित धोरणांचा, परस्पर समन्वयाचा आणि हरित भविष्याकडे वाटचाल करण्याच्या दृढ संकल्पाचे द्योतक आहे.  महापालिकेची वाटचाल नियोजित शहराकडून आता प्लॅनेट पॉझिटिव्ह सिटीकडे समर्थपणे होत आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हाय-टेक' नवी मुंबई पोलीस: ८० टक्के गुन्ह्यांची उकल