प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
सुजाता पाटील ‘नवी मुंबई'च्या १४ व्या महापौर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या १४ व्या महापौर पदी ‘भाजपा'च्या सुजाता सुरज पाटील यांची तर उपमहापौर पदी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली. ‘महायुती'तील मित्र पक्ष असलेल्या ‘शिंदे सेना'ने ऐनवेळी आपले अर्ज मागे घेतल्याने ‘भाजपा'च्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. या निवडीसोबतच नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘भाजपा'ची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे जवळपास ६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नवी मुंबई शहराला प्रथम नागरिक (महापौर) आणि द्वितीय नागरिक (उपमहापौर) मिळाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी रोजी पार पडून महापालिकेत ‘भाजपा'ने ६५ नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाचे पाठबळ अशा एवूÀण ६६ नगरसेवकांचे संख्याबळ प्राप्त केले आहे. तर विरोधात निवडणूक लढलेल्या ‘शिवसेना शिंदे गट'चे ४२ नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहेत. यानंतर ‘नवी मुंबई'च्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी ५ फेब्रुवारी निवडणूक जाहीर करण्यात आली.
दुसरीकडे महापालिका सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील ‘महायुती'मधील मित्र पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात कमालीची चुरस पहायला मिळाली. महापालिकेत ‘भाजपा'चे स्पष्ट बहुमत असतानाही ‘शिवसेना शिंदे गट'ने महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरवून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. ५ फेब्रुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेेच्या सुरुवातीला दोन्ही बाजुंनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र होते. मात्र, प्रत्यक्ष निवडीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ‘शिवसेना'ने माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीतील सस्पेन्स संपला.
निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर घणाघाती आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत होते. उमेदवारी अर्ज मागे घेताना शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांनी स्थानिक पातळीवर ‘भाजपा'ने युतीधर्म पाळला नसला, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि ‘युती'ची मर्यादा राखून आम्ही आमचे अर्ज मागे घेत आहोत, अशी भूमिका सभागृहात स्पष्ट केली.
तत्पूवार्ी महापालिका सचिव संघरत्ना खिल्लारे यांनी पीठासन अधिकारी ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे स्वागत केले. यानंतर पीठासन अधिकारी रणजित यादव यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली. महापौर पदासाठी दाखल झालेल्या अर्जातून शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी तसेच उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या अर्जातून शिवसेना नगरसेवक आकाश मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदावर सुजाता पाटील आणि उपमहापौर पदावर दशरथ भगत बिनविरोध निवडून आल्याचे पीठासन अधिकारी रणजित यादव यांनी सभागृहात घोषित केले.
निवडणुकीनंतर नवनियुवत महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांनी पदाचे स्थानग्रहण केल्यानंतर प्रथमतः सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
दरम्यान, नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागाप्रमुख तसेच इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.