नवीन पनवेलमध्ये झोपडपट्टीला भीषण आग

पनवेल : नवीन पनवेल, सेक्टर-१ मधील रेल्वे रुळांलगत असलेल्या झोपडपट्टीला ५ फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागली. या आगीत ५ झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यावळी २ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन २ तसाच्या अथक प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली. तसेच ६ सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सदर आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

५ फेब्रुवारी दुपारी १२.५५ वाजण्याच्या सुमारास नवीन पनवेल मधील शगुन बँक्वेट हॉलच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीला अचानक आग लागली. त्यामुळे या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढला. या घटनेची माहिती मिळातच नवीन पनवेल अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरुप भीषण असल्याने मदतीसाठी पनवेल अग्निशमन केंद्राच्या २ गाड्या आणि अतिरिक्त पाण्याचे टँकर पाचारण करण्यात आले.  

सदर आग इतकी भीषण होती की, त्यात ५ घरे पूर्णपणे भस्मसात झाली. या आगीत घरातील भांडी, कपाट, कपडे आणि पत्रे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने २ सिलेंडरचा स्फोट देखील झाला. त्यामुळे परिसरात मोठा आवाज झाला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत आगीतून ६ सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीची झळ शेजारील शगुन बँक्वेट वेडींग हॉललाही बसली असून, त्यांच्या छताचे आणि सामानाचे किरकोळ नुकसान झाले आहे.  

यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ होजच्या मदतीने पाण्याचा मारा करत तब्बल २ तासाच्या अथक प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंग प्रक्रिया राबवण्यात आली. या कामगिरीत उपअग्निशमन अधिकारी अतुल सपकाळ आणि शुभम राठोड यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी मोलाची भूमिका बजावली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुजाता पाटील ‘नवी मुंबई'च्या १४ व्या महापौर