प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पडघे गावच्या मुख्य वळणावर पथदिव्यांचा अभाव
भिवंडीः भिवंडी तालुक्यातील पडघे गावाच्या मुख्य वळणावर अद्यापही पथदिव्यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील पडघा टोल नाक्यापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या पडघे गावच्या मुख्य वळणावर, बिकानेर दुकानासमोर तसेच नाशिककडून येताना शेरेकर पाडा मार्गे पडघे गावात प्रवेश करताना रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार पसरलेला असतो.
या मार्गावरुन नाशिक-भिवंडी दरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने सातत्याने ये-जा करत असतात. महामार्गावरुन अचानक पडघे गावाकडे वळण घेताना योग्य प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली असून स्थानिक नागरिक, पादचारी, विद्यार्थी तसेच रात्री कामावरुन घरी परतणारे कामगार यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग'च्या बांधकामाला अनेक वर्षे उलटून गेली असतानाही या महत्त्वाच्या वळणांवर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सदर बाब आश्चर्यकारक आणि चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी पथदिवे नसणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.
सदर गंभीर बाब लक्षात घेऊन ‘लोकधारा प्रतिष्ठान'च्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पडघा टोल नाक्यापासून सुमारे १०० ते २०० मीटर परिसरातील दोन्ही बाजुंच्या पडघे मुख्य वळणांवर तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी ‘लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्ट'चे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग क्र.३ चे प्रकल्प संचालक यांच्याकडे ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन सादर करुन सदर ठिकाणी त्वरित प्रकाशव्यवस्था उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पथदिवे बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.