प्रा. वृषाली मगदूम यांना 'डॉ. भा. ल. भोळे-यशवंत सुमंत स्मृती' पुरस्कार प्रदान

नवी मुंबई  :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांना यंदाचा मानाचा डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यशवंतराव दाते स्मृती संस्थेतर्फे वर्धा येथील बजाज सभागृहात आयोजित एका भव्य समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अभय बंग यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख २० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रा. मगदूम यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य तीन मान्यवरांनाही त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात दीपक गायकवाड (पुणे - वैचारिक लेखन), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे - युवा संशोधन) आणि डॉ. नागोराव (लातूर - जीवन गौरव) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्राला ज्ञानोबा आणि तुकोबांनंतर विनोबा भावे यांच्या रूपात थोर साहित्य संस्कृतीची परंपरा लाभली आहे. विनोबांचे विचार चिरंतन असून ते आजही समाजाला दिशा देण्यास समर्थ आहेत. असे गौरवोद्गार काढले.

प्रा.वृषाली मगदूम यांनी सध्याच्या काळात लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना समाजातील शेवटच्या स्तरावर काम करणे गरजेचे आहे, तसेच कचरा वेचणाऱ्या महिलांचे दारिद्र्य पूर्णपणे संपलेले नसले, तरी संघर्षाच्या जोरावर त्या वैचारिकदृष्ट्या अधिक सजग आणि कणखर झाल्या आहेत. असे स्पष्ट केले. या कार्यक्रमात राज्य ग्रंथालय संघ, मुंबईचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनाही सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पडघे गावच्या मुख्य वळणावर पथदिव्यांचा अभाव