भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण संथ गतीने,शहरातील श्वानांची दहशत कायम 

भिवंडी: भिवंडी शहरात बारा वर्षीय मुलाचा श्वान दशांगुळे मृत्यू झाल्याने भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरातील ईदगाह,शांतीनगर,कामतघर, नागाव गायत्रीनगर,निजामपूर,

कोंबडपाडा या भागात मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे असून त्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागास अपयश आले आहे.ज्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे.पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बारा वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र ११ नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा नव्याने सुरू केले.व्हेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर अँड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेस हे काम सोपवले असून त्यासाठी संस्थेस प्रति श्वानाच्या नसबंदी वर १४४० रुपये दिले जातात.शहरात साधारण २४ हजार भटके कुत्रे असून आज पर्यंत अवघ्या ६१३६ श्वानांची लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात आले आहे.जी संख्या एकूण संख्येच्या प्रमाणात अत्यल्प असून नसबंदी केलेल्या श्वानांचे कान कापले जातात.परंतु ते कान छोट्या प्रमाणात कापले जात असल्याने नसबंदी झालेल्या श्वानांची ओळख पटत नसल्याने नक्की श्वान दंश कोणत्या श्वानाने केला आहे हे ओळखणे जिकिरीचे झाले आहे.त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.शहरातील उपजिल्हा रुग्णालय व पालिका बीजीपी दवाखाना येथे श्वानदंशांवरील रुग्णां वरील उपचार केले जात नसल्याची ओरड होत असताना स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय व पालिकेच्या बीजीपी दवाखान्यात या रुग्णांवर नियमित उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती समोर आली आहे.भिवंडी पालिका क्षेत्रात व नजिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.ज्यामुळे श्वानदंशा च्या घटना सुद्धा वाढल्या आहेत.स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात ११ हजार ३७ तर पालिका बीजीपी दवाखाना येथे १ एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ६ हजार १३६ रुग्णांवर श्वान दशांवर प्रभावी अँटी रेबीज व्हॅक्सिन ही लस देण्यात आली आहे.महापालिकेकडे पुरेसा लसीचा साठा उपलब्ध असून स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयास ही लस पुरवठा मनपा आरोग्य विभागाने केला आहे.अशी माहिती पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रा. वृषाली मगदूम यांना 'डॉ. भा. ल. भोळे-यशवंत सुमंत स्मृती' पुरस्कार प्रदान