प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर सुरेश वांदिले यांचा संवाद
नवी मुंबई : सोपे शब्द, सुटसुटीत वाक्य, बिनचूक रचना, मोजकी मांडणी आणि स्पष्ट विचार अशी शासकीय सुलेखनाची पंचसूत्री असून मराठी भाषेतील अभिजातता वृध्दिंगत करण्यामध्ये शासकीय मराठी लेखनाचाही महत्वाचा भाग असल्याचे मत सुप्रसिध्द लेखक तथा शासनाच्या ‘माहिती-जनसंपर्क संचालनालय'चे निवृत्त संचालक सुरेश वांदिले यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या ‘कार्यालयीन मराठी लेखन आणि मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी महापालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, परिमंडळ-२ चे उपायुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, सहा.आयुक्त अरुण पाटील तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर लगेचच ‘भाषा संचालनालय'ची स्थापना झाली आणि मराठी भाषेतून शासन व्यवहार सुरु झाला. शासकीय मराठी उत्तम रितीने बोलली आणि लिहिली जावी यादृष्टीने शासन व्यवहार कोश प्रसिध्द करण्यात आला. या कोशासह प्रशासनिक लेखन, मराठी लेखन मार्गदर्शिका अशी मराठी शब्द भांडार वाढविणारी आणि त्याचा लेखनात उपयोग करण्यासाठी लाभदायी ठरणारी पुस्तके प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या वाचनात तसेच संग्रहात असायलाच हवीत, असे आग्रही मत सुरेश वांदिले यांनी मांडले.
आपल्या बोलीचा प्रभाव आपल्या लिखाणावर पडतो. त्यामुळे आपण लिहिलेले जास्तीत जास्त लोकांना समजावे यासाठी प्रमाण भाषेत लिहीले जावे, असेही ते म्हणाले. पुस्तके वाचली नाहीत तरी किमान वर्तमानपत्राचे संपादकीय तरी वाचावे. त्यामुळे भाषा समृध्द होईल. तशी नियमित सवय लावून आपला व्यासंग वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘भाषिणी' या केंद्र सरकारने विकसीत केलेल्या विशेष ॲपमध्ये ३७ भाषांचा समावेश असून त्यामध्ये मराठीसह २२ भारतीय भाषा आहेत, अशी माहिती देत २०२५ च्या भाषा धोरणातील महत्वाच्या बाबींविषयी त्यांनी भाष्य केले.
त्यासोबतच मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी या विषयावर संवाद साधताना सुरेश वांदिले यांनी इंजिनिअरींग, मेडिकल अशा ठराविक चौकटीतील क्षेत्रांच्या पलिकडे जाऊन विद्यार्थी आणि पालक विचार करीत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. भारत सरकारमार्फत शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या पटकन संधी उपलब्ध होतील अशा सागरी वाहतूक, पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग, विमानतळ व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणसंस्था संपूर्ण देशभरात सुरु असून अशा व्यवसायाभिमुख अभ्यास क्षेत्रांकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
याशिवाय पारंपारिक शिक्षण क्षेत्रांच्या पलिकडे जाऊन आगामी १०-१५ वर्षात चांगली संधी देणारे योग प्रशिक्षण, वेडींग प्लॅनर, इव्हेंन्ट मॅनेजमेंट, मानसोपचार तज्ञ, सायबर तज्ञ अशा आजच्या जगाशी सुसंगत अनेक व्यवसाय क्षेत्रे आहेत. त्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठी युवकांमध्ये आणि पालकांमध्ये चौकटीबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची आणिरोजगाराची मानसिकता दिसून येत नाही. या चौकटी ओलांडून मोठया संधी उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेण्याकडे मराठी तरुणांनी विशेष लक्ष दयावे असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आणि अभिमान बाळगताना मराठी वाचविण्याकडे असलेली आपली मानसिकता बदलून मराठी वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. इंग्रजी आलीच पाहिजे; मात्र दैनंदिन व्यवहारात मराठी जपली पाहिजे असे सांगताना त्यांनी पंढरीचा विठोबा आणि वारकरी आहेत तोपर्यंत मराठी भाषा प्रवाही राहणार, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत उद्या २७ जानेवारी २०२६ रोजी, सकाळी ११ वाजता मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न होत असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ‘वाचनकट्टा' अभिनव संकल्पना शाळा-महाविद्यालयात राबवून नव्या पिढीत वाचन प्रेरणा निर्माण करणारे या अभिनव संकल्पनेचे संस्थापक युवराज कदम ‘वाचाल तर वाचाल' या विषयावर शिक्षक, पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तरी नवी मुंबईकर साहित्यप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन ‘नमुंमपा'तर्फे करण्यात आले आहे.