भाजपा स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष; कार्यकर्त्यांचा सेवा, निष्ठेचा संकल्प कायम

पनवेल : जगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या ‘भारतीय जनता पार्टी'चा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी पनवेल तालुका आणि शहर भाजपा मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९८० साली स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या अनेक दशकांत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पक्ष ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच पक्षाच्या संस्थापकांचे आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीप्रती निष्ठा राखण्याचा आणि समाजसेवेचा संकल्प पुन्हा दृढ केला. यावेळी पेढे एकमेकांना वाटून ‘भाजपा' स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 
यावेळी ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत यांनी आपल्या भाषणात ‘भारतीय जनता पार्टी'च्या प्रवासाचा आढावा घेतला आणि पक्षाने देशाच्या विकासात बजावलेली भूमिका अधोरेखित केली. ‘भारतीय जनता पार्टी'चा स्थापना दिवस केवळ एक औपचारिक सोहळा नसून, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा, निष्ठा आणि सेवा भावनेचा नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे, संघटन बळकट करण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच प्रितम म्हात्रे यांनी आजपासून सात दिवस ‘रोजगार सप्ताह' आयोजित करण्यात आल्याचे सांगून या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.
 
या कार्यक्रमाला ‘पनवेल पंचायत समिती'चे उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिका महिला-बाल कल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या शहर अध्यक्षा नगरसेविका रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, श्वेता भोईर, माजी नगरसेवक सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, अनुराधा ठोकळ, सारिका भगत, नलिनी शेलार, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, सपना पाटील, लीना पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रुपक्ष नागवेकर, निलेश म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
दरम्यान, भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त आपल्या घरांवर पक्षध्वज फडकावले असून, पक्ष कार्यालयांना आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात कार्यशाळेचे आयोजन