प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
शिवमंदिर सुशोभीकरण विस्थापितांचे पुनर्वसन करा!
अंबरनाथः येथील ऐतिहासिक श्री शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि ‘फेसलिपट' प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या स्थानिक कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३० कुटुंबे बेघर झाली असून, त्यांना तातडीने तात्पुरता निवारा आणि कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अंबरनाथचे नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी या कुटुंबांची घरे पाडण्यात आली, मात्र त्यानंतर त्यांना प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने ही कुटुंबे सध्या उघड्यावर आणि अत्यंत हालखीच्या परिस्थितीत दिवस काढत आहेत.
मानवीय दृष्टिकोनातून या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती करताना, नगरसेवक शेख यांनी एकता नगर येथील विस्थापित कुटुंबांना त्वरित शेल्टर होम्समध्ये हलवून तिथे अन्न, पाणी, वीज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. तसेच, या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना ‘प्रकल्प बाधित' असल्याचा दाखला देण्यात यावा, जेणेकरून शासनाच्या आगामी गृहनिर्माण योजनांमध्ये त्यांना हक्काची कायमस्वरूपी घरे (Permanent Residences) मिळू शकतील. ही कुटुंबे अनेक वर्षांपासून शिवमंदिर परिसरात वास्तव्यास असल्याने अचानक ओढवलेल्या या संकटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन येणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चेला घ्यावा, अशी विनंती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सुशोभीकरणाचा प्रकल्प शहराच्या वैभवात भर घालणार असला, तरी त्यासाठी स्थानिक नागरिकांचा बळी दिला जाऊ नये आणि प्रशासनाने विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असा सूर या निमित्ताने उमटत आहे.