मुरबाड मध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार

मुरबाडः मुरबाड तालुक्याला ३ एप्रिल रोजी आलेल्या  वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत घरांची मोठी पडझड झाली असून, घरांवरील छते (पत्रे आणि कौले) उडून गेल्याने अनेक रहिवासी बेघर झाले आहेत.तसेच शेतीचे नुकसान झाले आहे.वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वेगवान वाऱ्यामुळे मातीच्या आणि कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, सिमेंट आणि लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडाले. यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे आणि संसारोपयोगी साहित्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने किंवा तारा तुटल्याने तालुक्यातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचेही या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

रहिवाशांची दयनीय अवस्था

ज्या कुटुंबांच्या घरांवरील छते उडाली आहेत, त्यांच्यासमोर आता राहायचे कुठे, असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. लहान मुले आणि वृद्धांना घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करताना ग्रामस्थांची मोठी ओढाताण होत आहे. काही ग्रामस्थांनी शाळा किंवा समाजमंदिरांचा तात्पुरता आसरा घेतला आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल विभागाने नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्तांना तातडीची शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. अचानक आलेल्या वादळाने आमचा सगळा संसार उघड्यावर आला आहे. हातावर पोट असलेल्या आम्हा गरिबांना आता घर पुन्हा उभं कसं करायचं, याचीच चिंता सतावत आहे. सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी. अशा प्रतिक्रिया आता स्थानिक व्यवत करत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'माझी माय' प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित