‘ठामपा'ची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र

ठाणे : ठाणे महापालिकाकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील व्याज, दंड, प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट (सवलत) देणे सुरु असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. १ मार्च ते १६ मार्च २०२६ या १६ दिवसांत पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण १४ कोटी ८८लाख २ हजार १३३  रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेली सवलत ३१ मार्चपर्यत सुरू असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाहीत, अशा थकबाकीदारांवर १ एप्रिल २०२६ पासून कारवाईची मोहिम अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

थकीत करवसुली कारवाईत दिवा येथे २०२ नळसंयोजन खंडीत करण्यात आली, २८ पंप जप्त तर १४ पंप रुम सील करण्यात आले असून ७५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समितीत १५५ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत ६३ नळसंयोजने खंडीत करुन एकूण ४३८ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत ८२ नळसंयोजने खंडीत करुन १४१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत १९ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समितीत १२ नळसंयोजने खंडीत करुन ६३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण ५३३ नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर २८ पंप जप्त, १४ पंप रुम सील करण्यात आले असून एकूण ७१७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

याशिवाय नागरी सुविधा केंद्र आणि इतर माध्यमांतून ३३,९१,५१९ लाख इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुध्द सदर मोहीम यापुढेही सुरु राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकातर्फे करण्यात आले आहे.

प्रभाग समितीनिहाय वसुली (रुपयात):
माजिवडा मानपाडा ४,३६,६४,८६१
नौपाडा कोपरी १,६९,५३,६३६
कळवा १,७४,६८,७४०
वर्तकनगर १,६९,९५,६३०
उथळसर १,५२,६४,१७३
दिवा १,२०,२८,२०४
लोकमान्य/सावरकरनगर ९४,१८,९६०
मुंब्रा प्रभाग ५२,३६,३५१
वागळे प्रभाग ८३,८०,०५९. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावाचे ‘शुक्लकाष्ट' कायम?