दिल्ली ते मुंबई ‘हिंदायान सायक्लोथॉन'ला महापौरांकडून हिरवा झेंडा

ठाणे : भारत सरकारच्या युवा व्यवहार-क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीपासून ३० नोव्हेंबर रोजी सुरु झालेली ‘हिंदायान सायक्लोथॉन' ठाणे येथून मुंबईकडे निघाली. या ‘सायक्लोथॉन'ला महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथे हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या.

या ‘हिंदायान सायक्लोथॉन'मध्ये उत्स्फुर्तपणे सायकलप्रेमी सहभाग घेतला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक सायकलस्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतले.

भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणे, असा या मागचा उद्देश आहे. दिल्लीपासून सुरु झालेला सदर प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचत आहे, सदर अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी नमूद केले.

उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ‘फिट इंडिया' उपक्रमांतर्गत या ‘सायक्लोथॉन'चे महत्त्व अधोरेखित केले. सायकलिंग उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक क्षमता वाढवतो. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

ठाणे महापालिकापासून सुरु झालेल्या ‘हिंदायान सायक्लोथॉन'चा कुलाबा मिलिटरी स्टेशन, मुंबई येथे समारोप  झाला. यावेळी मेजर सागर सावंत यांच्या हस्ते प्रत्येक सायकलप्रेमींना आकर्षक पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विष्णुदास चापके यांनी या सायक्लोथॉन आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत भविष्यात अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘हिंदायान फाऊंडेशन'चे प्रमुख विष्णुदास चापके, ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन'च्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्य अमोल कुळकर्णी, ठाणे महापालिका प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे कर्मचारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईकरांनो सावधान!