‘नमुंमपा'ची प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम

नवी मुंबई : प्लास्टीकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला पोहोचणारा धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टीकचा वापर थांबविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीप्रमाणेच दुकाने आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्लास्टीक प्रतिबंधात्मक मोहिमा राबवून विभाग कार्यालयातील तसेच परिमंडळ कार्यालयातील विशेष पथकांद्वारे नियमितपणे तपासणी करण्यात येत असते. या तपासणीमध्ये प्लास्टीक पिशव्या अथवा एकल वापर प्लास्टीक वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच एकल वापरातील प्लास्टीकचे साहित्य जप्त करण्यात येते.  

या अंतर्गत जानेवारी २०२५ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत ११ महिन्यामध्ये २० लाख ६५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून २१४६.९७० किलोग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जानेवारी मध्ये ३३ आस्थापनांवर कारवाई करीत १.६५ लक्ष दंडात्मक वसूली आणि ६२.८०० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ३९ आस्थापनांवरील कारवाईत १२३.६०० किलो प्लास्टीक जप्त करुन १.९५ लाख दंडात्मक वसूली करण्यात आली. मार्च महिन्यात ६५ आस्थापनांवरील कारवाईमध्ये ४३०.१२० किलोग्रॅम, एप्रिल मधील कारवाईत २७ आस्थापनांकडून ३९८.३०० किलो, मे महिन्यात ३२ आस्थापनांकडून ११३.५०० किलो, जून मध्ये ४४ आस्थापनांवरील कारवाईत २५२.५५० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.

जुलै महिन्यात ८५ आस्थापनांकडून १७६.२०० किलो प्लास्टीक जप्त करुन ४.२५ लक्ष दंडात्मक वसूली, ऑगस्ट मध्ये १४ आस्थापनांकडून ३७४.७०० किलो, सप्टेंबर महिन्यात ३३ आस्थापनांकडून ८८.९०० किलो, ऑक्टोबर ५ आस्थापनांकडून ६.७०० किलो तर नोव्हेंबर महिन्यात ३५ आस्थापनांवरील कारवाईत १.७५ लक्ष दंडात्मक वसूली आणि ११९.६०० किलोग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टीक जप्त करण्यात आले.

अशाप्रकारे जानेवारी पासून ११ महिन्यात एकूण२०.६५ लक्ष दंडवसूली करण्यात आली असून २१४६.९७० किलोग्रॅम एकल वापराचे प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.

एकल वापर प्लास्टीक आणि त्यातही मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर नागरिकांनी टाळावा, याकरिता ‘नमुंमपा'च्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून त्यासोबतच प्लास्टीक प्रतिबंधात्मक विशेष मोहिमाही राबविण्यात येत आहेत. याकरिता विभागनिहाय ८ तसेच परिमंडळनिहाय २ अशी १० विशेष पथके तैनात आहेत. त्यांच्यामार्फत विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन एकल वापर प्लास्टिकचा उपयोग होत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामागे दंडवसूली भूमिका नसून प्लास्टिकचा वापर थांबावा, असे उद्दिष्ट आहे.

प्लास्टीकमुळे निसर्गाला आणि मानवी जीवनाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने प्लास्टीक पिशव्यांचा वापर पूर्णतः टाळावा. कापडी अथवा कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा. तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टीक पिशव्या देऊ नयेत. प्लास्टीक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत आणि इतर एकल वापर प्रकारातील प्लास्टीकच्या वस्तुही वापरु नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.  

-डॉ.कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिंगापूर, जर्मनी, एस्टोनिया मधील विद्यार्थ्यांची नवी मुंबइला अभ्यास भेट