मुंबई : निवडणुका संपल्याने आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झाला असल्याने राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान द्या, मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
नुकतीच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा आणि मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वंराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या जाणाऱ्या ‘एसआयआर' मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदारसंघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या?, याची विचारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिला. मतदारसंघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए' नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए' सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
संपर्कप्रमुखांना सूचना
- मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे
- मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करणे
- ‘एसआयआर'साठी दोन ‘बीएलए' नियुक्त करणे
- ‘बीएलए'सोबत दररोज बैठक घेणे
- लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे
- बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे