प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई संघ अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग स्पर्धेत उपविजेता
नवी मुंबई : सर्व वयोगटातील महिला खेळाडूंसाठी २१ - २२ मार्च दरम्यान सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल, तपोवन- नाशिक येथे अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या मान्यतेने व इंडियन पिंंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने आयोजित महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियनतर्फे पार पडलेल्या स्पर्धेत २४ सुवर्ण ७ रौप्य व ७ कांस्य पदके जिंकून नवी मुंबई संघ उपविजेता ठरला. खेळामुळे अनेक ठिकाणी संधी उपलब्ध झाल्या असून खेळाडूंनी मेहनत आणि चिकाटीतून राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले व विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
२८ सुवर्ण, १३ रौप्य व १३ कांस्य पदके मिळवून सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. १७ सुवर्ण , १८ रौप्य आणि ३८ कांस्य पदके मिळवून नाशिक जिल्ह्याने तृतीय स्थान मिळवले. ७ सुवर्ण, १० रौप्य, ६ कांस्य पदके जिंकून अहिल्यानगर जिल्ह्याने चौथे स्थान मिळवले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ८०० महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. यावेळी स्नेहल साळुंके, उपसंचालक क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र, इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, नगरसेविका शितल भामरे आणि सुवर्णा मटाले तसेच अस्मिता देशमाने, मंगला भास्कर, सुचित्राताई गांगुर्डे समाजसेविका यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदके देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियन पदाधिकारी तृप्ती बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बक्षीस समारंभात स्नेहल साळुंके यांनी मीदेखील तुमच्यासारखीच खेळाडू आहे आणि मला खेळामुळेच शासकीय नोकरी मिळाली आहे; तुम्हीदेखील खेळातून स्वतःचे उज्वल भविष्य घडवू शकता असे सांगून खेळाडूंना मार्गदर्शन केले. किशोर येवले यांनी स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) ही स्पर्धा महाराष्ट्रातील मुलींसाठी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी केतन गुंजाळ, निलेश गाढवे, निलेश वाघ दत्तात्रय शेलार, पौर्णिमा तेली, लक्ष्मण दातीर, नागेश बनसोडे, योगेश पानपाटील, आकाश धबडगे, रूपाली वाघ यांनी परिश्रम घेतले.