प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
३ फेब्रुवारी रोजी केडीएमसी महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना २९ आणि ३० जानेवारी रोजी आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून सदर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ‘महायुती'चाच महापौर बसेल असा दावा निवडणुकीपूर्वीपासून ‘शिवसेना-भाजप महायुती'च्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर भाजप आपसुकच त्यांच्याकडे या प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने शर्यतीतून बाहेर पडला. याउलट ‘शिवसेना'कडे या प्रवर्गातील २ नगरसेवक असल्याने ‘शिवसेना'चा या पदावरील दावा भक्कम झाला आहे. ‘केडीएमसी'मध्ये पुढील अडीच वर्षासाठी ‘शिवसेना'ेचा महापौर बसणार ते जवळपास निश्चित झाले आहे. या प्रवर्गातून ‘शिवसेना'कडे हर्षाली थवील आणि किरण भांगले असे २ नगरसेवक असून या दोन्ही नगरसेवकांनी महापौर पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.
तर महापौर पदावर कोण विराजमान होणार? ते अद्यापी गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा एक भाग असलेला आंबिवली टिटवाळा या भागाला आतापर्यंतच्या इतिहासात एकदाही महापौर पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी या भागाच्या नगरसेविका असलेल्या थवील यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली जावी यासाठी या भागातील ‘महायुती'चे लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. तर दुसरीकडे भांगले शहरप्रमुख रवी पाटील यांचे निकटवर्ती असल्याने भांगले यांना या पदावर विराजमान करण्यासाठी पाटील यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पदावर नेमकी कोणाची वर्णी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुका होऊन १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आत्ता केडीएमसी महापौर आणि उपमहापौर पदासाठीची लगबग सुरूरु आहे. महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून महापौर आणि उपमहापौर निवडी बाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार २९ आणि ३० जानेवारी रोजी या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतील. तर प्राप्त अर्जावर मतदान प्रक्रियेने किंवा एकच अर्ज प्राप्त झाल्यास बिनविरोध पध्दतीने ३ फेब्रुवारी रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर घोषित केला जाईल.