प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर असणा-या 782 कर्मचा-यांना कायदेशीर नोटीसा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या 15 जानेवारी होणा-या निवडणूक कामकाजाकरिता नियुक्त कर्मचा-यांच्या प्रशिक्षणास महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारीपासून विभागानिहाय सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे कोपरखैरणे विभागातील प्रभाग क्रमांक 10,11,12,13 यामध्ये नियुक्त कर्मचा-यांचे तसेच दुपारच्या सत्रात तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक 14,15,19,20 या प्रभागातील निवडणूक केंद्रांवर नेमलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 1,2,3 अशा निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण पार पडले. त्याचप्रमाणे ऐरोली से.5 येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात ऐरोली विभागातील प्रभाग क्रमांक 4,5,7 यामधील निवडणूक कामकाजासाठी मतदान केंद्रावर नेमलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले.
यावर्षीची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असल्याने प्रत्येक मतदाराला 4 मते द्यावयाची आहेत याबाबतची चित्रफित प्रशिक्षणामध्ये दाखविण्यात आली त्याचप्रमाणे ईव्हिएम मशीनचे प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षणही घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये निवडणूक विषयक कामकाजातील प्रत्येक बाबीवर सविस्तर माहिती देण्यात आली तसेच प्रशिक्षणार्थीच्या मनातील विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
1 जानेवारी पासून सुरू झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात आत्तापर्यंत नेरुळ,बेलापूर,दिघा,घणसोली या चार विभागांचे प्रशिक्षण झालेले असून त्यामध्ये गैरहजर असणा-या 782 कर्मचा-यांना तात्काळ हजर होण्याच्या कायदेशीर नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. निवडणूक विषयक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून प्रत्येक कर्मचा-याने त्यासाठी आपली झालेली नियुक्ती जबाबदारी समजून स्वीकारली पाहीजे व त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
याची जाणीव न ठेवता चार विभागांच्या झालेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या 782 कर्मचा-यांना त्वरीत संबधित विभागांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर नोटीस मिळाल्यानंतर ब-याच प्रमाणात कर्मचारी हजर होत असून नोटीशीची दखल न घेणा-या संबधित कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटीसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 6 जानेवारीच्या ऐरोली,कोपरखैरणे व तुर्भे विभागातील निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्मचा-यांच्या प्रशिक्षण वर्गास उपस्थित न राहणा-या कर्मचा-यांनाही नोटीसा बजावण्यात येत आहेत.
नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी 1148 मतदान केंद्रे असणार आहेत. त्याठिकाणी आवश्यक कर्मचा-यांच्या नेमणूकीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्राधान्याने रायगड जिल्ह्यातील शासकीय – निमशासकीय कार्यालये व शालेय कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील शासकीय - निमशासकीय कार्यालय व शाळा यांचेही कर्मचारी निवडणूक कामासाठी नेमण्यात आले आहेत. सर्व मिळून साधारणत: 6500 हून अधिक कर्मचा-यांची मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आली आहे.
7 जोनवारी रोजी सकाळी 10 वाजता वाशी विभागातील प्रभाग क्र. 16,17,18 करिता निवडणूक कामासाठी मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण संपन्न होत असून नियुक्ती आदेश प्राप्त कर्मचा-यांनी 100 टक्के उपस्थिती दर्शवावी व कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.