शहर स्वच्छतेसह प्रत्येक घरापासूनच कचरा वर्गीकरण महत्वाचे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे नागरी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करीत असून गुणवत्तापूर्ण तसेच गतीमान कामकाजावर भर देत आहेत.

सकाळी ६ वाजताच आयुक्तांकडून स्वच्छता कामकाजाची पाहणी...

स्वच्छता नवी मुंबई शहराची ओळख असून शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ३ मे रोजी सकाळी ६ वाजता बेलापूर क्षेत्राला भेट देत स्वच्छता कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शहरात सकाळी ६ वाजता साफसफाईचे काम सुरु होऊन सकाळी ६.३० वाजल्यापासून कचरा संकलनाचे काम सुरु झाले पाहिजे, असे निर्देश यापूर्वीच आयुक्तांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी चालणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'च्या विशेष आढावा बैठकीत दिेले.

दैनंदिन कचरा वर्गीकरणावर भर...

कचऱ्याचे ओला, सुका आणि घरगुती घातक असे ३ प्रकारे घरातूनच दररोज वर्गीकरण केले जाणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत नागरिकांना दैनंदिन सवय लागावी याकरिता सातत्याने जनजागृती करीत राहणे आवश्यक आहे. याकरिता कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता मित्रांपासून ते विभागप्रमुखांपर्यंत घनकचरा व्यवस्थापनासह इतर सगळयाच विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून जनजागृतीचे काम करावे. त्याचप्रमाणे मोठ्या सोसायटयांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून विल्हेवाट लावली जाणे अनिवार्य असून सदर प्रकल्प नियमीत कार्यान्वित राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आल्यास घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागणार नाही. तसेच मोठ्या सोसायट्यांमध्ये कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प राबविल्याने तेथील कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करावी लागणार नाही. या दोन्ही गोष्टींमुळे श्रम आणि मुल्यांमध्ये लक्षणीय बचत होईल, अशी बाब लक्षात घेऊन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.    

कचरा संकलन, वाहतुकीचे होणार विभागनिहाय सूक्ष्म नियोजन...

कचरा संकलन आणि त्याची वाहतूक यांच्या वेळा निश्चित करुन त्याचे विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करावे आणि आठवड्याभरात सर्व विभागांचा क्षेत्रनिहाय नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

वर्दळीच्या व वाणीज्य भागात सकाळी आणि रात्री दोन वेळा साफसफाई केली जात असून याकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीने रात्री उशीरापर्यंत वर्दळ असते असे बसस्टॉप, रेल्वे स्थानक परिसर, बाजाराची काही ठिकाणे येथे अधिक काळजीपूर्वक स्वच्छता करण्याचे सूचित करण्यात आले.

शालेय स्वच्छतेवर विशेष भर...

शालेय स्वच्छता यापूर्वी ‘स्वच्छता अभियान' मधील स्वतंत्र असणारा घटक यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने शाळांचे वर्ग आणि परिसराची नियमित स्वच्छता राखण्याकडे विशेष लक्ष देणे, २ कचरापेट्या ठेवणे, घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीची स्वतंत्र व्यवस्था करणे, कंपोस्ट पिटस्‌ कार्यान्वित ठेवणे त्यासोबतच शाळांमधील शौचालयांची स्थिती चांगली राहील या गोष्टींची प्राधान्याने काळजी घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

यापूर्वी आयुक्तांनी शिरवणे शाळेच्या पाहणी दौऱ्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय भेटीप्रसंगी त्या भागातील शाळांना भेटी देऊन तेथील सेवा-सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी करावी, असे सूचित केले होते. आजचे शालेय विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण नागरिक असल्याने त्यांच्या मनावर लहानपणापासूनच स्वच्छतेचा संस्कार शाळांतून व्हावा यादृष्टीने याकडे अधिक लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचवले.

वायू प्रदूषण रोखण्याकडे विशेष लक्ष...

वायू प्रदूषण एक गंभीर समस्या असून त्यादृष्टीने ठोस उपाययोजना करताना धूळ प्रदुषण रोखण्यासाठी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याची नियमीतपणे खात्री करावी. तसेच बांधकाम साहित्य अथवा तोडकामाचा घनकचरा वाहून नेताना तो रस्त्यावर पडून होणाऱ्या प्रदुषणाला संबंधित बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी निश्चित करावी. सदरचा कचरा साफ न केल्यास संबंधितांवर ठोस कारवाई करावी. त्याचप्रमाणे वॉटर फॉगिंग तसेच दर आठवड्याला डीप क्लिनींगवर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

शहर सुशोभिकरण नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याकडे कल...

शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देताना आयुक्तांनी सार्वजनिक जागी काढलेल्या भित्तीचित्रांचे आवश्यक त्या ठिकाणी पुनर्रंगकाम करावे, शिल्पाकृतींची दुरुस्ती करावी तसेच काही व्हर्टिकल गार्डन्सच्या ठिकाणी आर्कटिेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन त्यातील उत्तम संकल्पना राबवाव्यात, असे सूचित केले.

‘स्वच्छता'साठी नागरिकांच्या कृतीशील सहभागासाठी विशेष प्रयत्न...

स्वच्छता कार्यात संपूर्ण यश मिळण्यासाठी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य अत्यंत महत्वाचे असून ‘हे माझे शहर आहे, माझे शहर स्वच्छ राखण्यात मी १०० % योगदान देईन', अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात कायमस्वरुपी रुजविण्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्तीने काम करावे, असे आयुक्त डॉ. कैलास शिेंदे यांनी सूचित केले.

दरम्यान, यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' मध्ये करावयाच्या कामांबाबतचा कृती आराखडा सादरीकरणाद्वारे उपस्थितांसमोर मुद्देनिहाय मांडण्यात आला आणि प्रत्येक विभागाची या कामांमधील जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. स्वच्छता विषयीच्या प्रत्येक बाबींवर सर्वेक्षणातील मुद्द्यांच्या अनुषंगाने निरीक्षण करण्यासाठी आठही विभागांकरिता विभागप्रमुख दर्जाच्या आठ नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत स्वच्छता कामांचे महापालिका स्तरावर परीक्षण केले जाणार आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा अभियान'ची सामुहिक शपथ घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाढत्या उन्हाचा वाहतूक पोलिसांना त्रास