एमजेपीच्या जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटलेल्या स्थितीत

नवीन पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपूर्वी  सिडको वसाहतीत पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. एमजेपीचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने पाणी पुरवठा पुर्ववत झाला नसताना नविन पनवेल सेक्टर 15 येथिल पोदी जोड स्थळावर जागोजागी एमजेपीच्या जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटलेल्या दिसत आहेत. यामधून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची दररोज नासाडी होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना सिडको वसाहतीमधील नागरिकांना  करावा लागत आहे. 

          पनवेल पालिका क्षेत्रातील पनवेल शहर, करंजाडे, कळंबोली, नवीन पनवेल व इतर गावांना एमजेपीकडून पाणी घेऊन ते वितरीत केले जाते. जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण या व्यतिरिक्त पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्यास एमजेपी अपयशी ठरत आहे. पनवेल झोपडपट्टीधारकांकडून पाणी चोरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करण्याचे प्रकार पनवेल तालुक्यात  मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे एमजेपी अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज नवनवीन ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याची कामे संथगतीने सुरू आहेत. यामुळे सिडको वसाहतीत पाण्याची समस्या अधिक जटील बनली आहे. येथिल सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने पनवेल शहरात झोपडपट्टीची संख्या वाढत असून त्यांना 24 तास पाणी मिळते मात्र करदाते हे पाणी समस्यांनी त्रस्त झाले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा