एपीएमसी फळ बाजारात समाईक जागेत व्यवसाय

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात  व्यापाऱ्यांना  व्यवसायासाठी गाळे वाटप करण्यात आले आहेत. मात्र, काही व्यापारी मर्यादित जागेपेक्षा अधिक समाईक जागेत व्यवसाय करीत असल्याने समाईक जागेत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर एपीएमसी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या ४ महिन्यात एकूण १७० व्यापाऱ्यांवर कारवाई करत २ लाख ७४ हजार ६०० रुपये दंड वसुली केली आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक बाजारासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीतून मुंबई उपनगरात शेतमाल किरकोळ विक्रीसाठी जातो. त्याच धर्तीवर एपीएमसी फळ बाजारात देखील ग्राहकांची  वर्दळ असून, मोठी उलाढाल असते. एपीएमसी फळ बाजारात जानेवारी महिन्यापासून विविध फळांचा हंगाम वाढतो. फेब्रुवारी महिन्यापासून एपीएमसी फळ आंबा हंगामाला देखील सुरुवात होते. मात्र, याच हंगामात अधिक नफा मिळवण्यासाठी एपीएमसी फळ बाजारातील काही व्यापारी  स्वतःच्या गाळ्यांच्या समाईक जागेत व्यवसाय करताना दिसत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी समाईक जागा अडवून ठेवल्याने एपीएमसी फळ बाजारात दाटीवाटी होऊन ग्राहकांना चालणे मुश्किल होऊन बसत आहे. एपीएमसी फळ बाजारात व्यवसाय करण्यासाठी  एपीएमसी प्रशासनाने जवळपास १ हजार पेक्षा अधिक व्यापाऱ्यांना गाळे वाटप करून दिले आहेत. मात्र, एपीएमसी फळ बाजारातील ग्राहक संख्या पाहता अधिकचा नफा मिळविण्यासाठी या बाजारातील काही व्यापारी गाळ्यांच्या समाईक जागेत व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. नोव्हेंबर-२०२२ मध्ये एपीएमसी फळ बाजारात आगीची घटना घडून २५ ते ३० गाळे आगीत जळून खाक झाले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, गवत आणि लाकडी पेट्या असल्याने आग अधिक भडकली होती. त्यामुळे सदर आगीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एपीएमसी प्रशासनाने  एक समिती नेमून अहवाल तयार केला होता. त्यात एपीएमसी फळ बाजारातील अतिक्रमण मुख्य कारण दिले होते. मात्र, सदर ठपका ठेवून देखील व्यापाऱ्यांनी कुठलाच बोध घेतला नसून, आजही अतिरिक्त जागेत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी फळ बाजारातील गाळ्यांव्यतिरिक्त समाईक जागेचा वापर तसेच मालधक्क्यांवर गाडी उभी करुन व्यवसाय करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला असून, जानेवारी ते मे २०२४ पर्यंत १७० व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून  २,७४,६०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे.

दरम्यान, एपीएमसी फळ बाजारात यापुढे समाईक जागेत व्यवसाय करताना दिसणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजार उप सचिव संगीता अढांगले यांनी दिली.

एकूण कारवाई                 दंड रुपये
जानेवारी - ५४                   ४६,६००
फेब्रुवारी - ७३                    १,४७,६००
मार्च   -  ३०                      ४८,४००
एप्रिल  - १२                      ३०,०००    
मे      - १                         २,००० 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 निवडणूक कालावधीत २.०९ कोटींची रोकड जप्त