ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
उरण मधील वीज समस्येबाबत भावना घाणेकर आक्रमक
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
उरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या वाहिन्यांवर पडतात. तसेच सततच्या पावसामुळे अधूनमधून कधी दिवसा तर कधी रात्री वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिक महिला, शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक, हॉस्पीटल मधील रुग्ण आदिंना मोठ्या प्रमाणात बसतो. अचानक खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विजेची उपकरणेही खराब होत असल्याने त्याचा आर्थिक फटका विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो. उरणकर नागरिकांची विजेची महत्वाची समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत करु नये. ज्या विभागात किंवा एरियात काम चालू असेल तर फक्त त्या एरियातील वीज पुरवठा बंद ठेवावा, इतर ठिकाणची वीज बंद करु नये. याशिवाय नागरिकांना आपली वीज समस्या, तक्रार फोन द्वारे ‘महावितरण'च्या कार्यालयात कळविण्यासाठी त्वरित लँडलाईन (हेल्पलाईन) सुरु करावा, अशी मागणी ‘राष्ट्रवादी महिला (शरदचंद्र पवार) काँग्रेस'चे प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, पनवेल विभागीय प्रमुख भावना घाणेकर यांनी ऊर्जा मंत्री, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, रायगड जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, तहसिलदार-उरण, ‘महावितरण'मुख्य अभियंता, आदिंना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
दरम्यान, सदर समस्येवर वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. अन्यथा ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्ष'तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भावना घाणेकर यांनी संबंधितांना दिला आहे.
एखाद्या भागात वीज गेली असता त्या भागातील वीज न घालवता संपूर्ण उरण तालुक्याची वीज घालवली जाते. मुसळधार पाऊस पंडल्यानंतर झाडे वीजेच्या तारावर अनेक तास तशीच पडून राहतात. कर्मचारी वर्ग वेळेत कधीच येत नाहीत. वीजेच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी ‘महावितरण'च्या कार्यालयात फोन केला तर तो बंद असतो. जरी फोनची रिंग वाजली तरी कुणीच फोन उचलत नाहीत. रात्री-अपरात्री पाऊस, वादळवारा मुळे कुठे काही अनूचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा आपत्कालीन वेळी नागरिकांचा ‘महावितरण'च्या कार्यालयात संपर्क होत नाही. अशावेळी नागरिकांनी काय करावे, असा सवाल भावना घाणेकर यांनी ऊर्जा मंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
वीज समस्येसंदर्भातील निवेदन देण्यासाठी भावना घाणेकर यांच्यासमवेत ‘राष्ट्रवादी'चे रायगड जिल्हा सरचिटणीस गणेश (नाना) नलावडे उपस्थित होते. दरम्यान, उरण मधील विजेच्या समस्येवर भावना घाणेकर आणि गणेश नलावडे यांनी आवाज उठविल्याने उरणकर नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करु. उरण मधील वीज समस्यांच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जाईल. -सिंहाजीराव गायकवाड, अधीक्षक अभियंता - वाशी, महावितरण.