३०० हून अधिक थकबाकीदारांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा
पनवेल : पनवेल महापालिका ‘कर संकलन-कर आकारणी विभाग'च्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसा देण्याचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत पनवेल महारपालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे ३००हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटिसा थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार पुढील महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांचा खूप जास्त मालमत्ता कर भरावयाचा राहीला अशा सुमारे १०१ औद्योगिक, १०७ अनिवासी, १०० निवासी थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांंमध्ये प्रसिध्द केली आहे. त्यांना आता जप्तीपूर्व नोटिसा देण्याचे काम महापालिकेने युध्दपातळीवर सुरु केले आहे. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात ३.५० लाख निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदि नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २६८ कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे.
जप्ती पथकाच्या कारवाईमध्ये खारघरच्या जप्ती पथकाकडून डाय दुकान जप्ती पूर्व नोटीस देण्यात आली. याचबरोबर कामोठे मधील ऐश्वर्या हॉटेल, उत्सव मेडिकल यांना जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली. न्यू पनवेल मधील रिध्दी सिध्दी रेसिडन्सी, स्टील मार्केट, तळोजा मधील विविध थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या.
मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.