नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट करा ; जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयामध्ये गुरुवारी पेडियाट्रिक थॅलेसेमिया विभागामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील ऑक्सीजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचे ऑडिट झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. नियमाप्रमाणे रुग्णालयाचे फायर ऑडिट करून रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.
30 मे बाल रुग्णांच्या पेडियट्रिक विभागामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यातच ऑक्सीजन पुरवठा करणारा पाईप देखील लीक झाल्याने आगीचा भडका उडाला. रुग्णालय प्रशासनाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत लीक झालेला ऑक्सिजनचा पाईप देखील दुरुस्त केला. उपचार घेत असलेल्या बालकांना काही काळ अन्यत्र हलवण्यात आले होते. मोठा अनर्थ टळला असला तरी या दुर्घटनेच्या निमित्ताने वाशी रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. आगीसारखी जेव्हा एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस बचावासाठी आवश्यक उपाययोजना असणे गरजेचे आहे. रुग्णालयाच्या मजल्यांवर शिड्या आणि रोप असायला हवे.
पाच किलो क्षमतेचे आग निवारण यंत्र उचलण्यास जड जाते. त्यासाठी हाताळता येतील असे कमी वजनाचे अग्नि नियंत्रण यंत्र बसवायला हवे. नव्याने आलेले महापालिका आयुक्त, सिटी इंजिनियर आणि रुग्णालय प्रशासन यांची ही जबाबदारी आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबतीत केवळ मागण्या करून हातावर हात ठेवून बसणे योग्य नाही तर त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली. ही आग कशामुळे लागली. अग्निशमन यंत्रणा, विद्युत आणि ऑक्सिजन यंत्रणेचे ऑडिट झाले आहे किंवा नाही, याची चौकशी करून अशाप्रकारे आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायला हवी. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि दीर्घकालीन उपायोजना कराव्यात असे त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सुचित केले. मुंबईतील रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने एका मातेला आणि तिच्या नवजात बालकाला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली होती, याची आठवण करून देत नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली, नेरूळ, वाशी आणि सीबीडी रुग्णालयांमधील सर्व प्रकारच्या सुरक्षेचे ऑडिट तातडीने करण्याबरोबरच बायोमेडिकल इंजिनियर नियुक्त करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे.
केवळ महापालिका रुग्णालयांचेच नव्हे तर खाजगी रुग्णालयाचे सुरक्षा ऑडिट देखील करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यामध्ये पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढते अशा वेळेस रुग्णालयांची उत्तम प्रकारे देखभाल केलेली असली पाहिजे. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी सभागृह अस्तित्वात नसल्याने सुरक्षित आरोग्य उपचारांची जबाबदारी महापालिका प्रशासनाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिला आहे.