पामबीच मार्गावर सॅन्ट्रो झेन कार जळुन खाक  

नवी मुंबई : सीवूड्स येथून पामबीच मार्गे वाशी येथे निघालेल्या तरुणाच्या सॅन्ट्रो झेन कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी भरदुपारी नेरुळ येथे घडली. सुदैवाने कार चालक तरुणाने वेळीच कारमधुन बाहेर पळ काढल्याने तो बचावला. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या कारला लागलेली आग 15 मिनीटात आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सदर कार पुर्णपणे जळून खाक झाली.  

सीवूड्स येथे राहणारा विकास नेर्लेकर हा तरुण शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीवूड्स येथून आपल्या सॅन्ट्रो झेन कारने पामबीच मार्गावरुन वाशी येथे कामानिमित्त जात होता. त्याची कार नेरुळ येथे आली असताना, कारमधुन वायर जळाल्याचा वास आला, त्यानंतर कारमधुन धुर येत असल्याचे विकासच्या निदर्शनास आले. त्यामुळे विकासने तत्काळ आपली कार रस्त्याच्या बाजुला उभी करुन कार मधुन बाहेर पळ काढला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच  महापालिकेच्या नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कारला लागलेली आग 15 मिनीटात आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सदर कार पुर्णपणे जळून खाक झाली. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे