ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे महापालिका उद्यानांतील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड
वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाचा उपक्रम
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
'उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना' या उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे २००० झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचे उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती यांनी सांगितले.
मा. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहेत. त्यानुसार, 'चला वाचूया' या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संचेती यांनी दिली.
प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सुमारे २००० झाडांची माहिती संकलित केली गेली आहे. त्या २००० हून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आले आहेत. झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, असेही संचेती यांनी स्पष्ट केले.
अशी मिळेल माहिती
• झाडावर लावण्यात आलेल्या क्यू आर कोड आपल्या स्मार्टफोन मध्ये स्कॅनरवर स्कॅन करायचा.
• क्यू आर कोड स्कॅन केल्यावर विकिपीडिया या वेबसाईट वरील लिंक उघडेल. त्यावर क्लिक केल्यावर त्या झाडाची माहिती मिळेल.
• ही माहिती मराठी व इंग्रजीत मिळू शकेल.
• माहितीमध्ये झाडाचे नाव, बॉटनिकल नाव, झाडांचे वैशिष्ट्य, उत्पत्तीस्थान आदींचा समावेश आहे.