करवाढ नसलेले ‘केडीएमसी'चे अंदाजपत्रक जाहीर

कल्याण : कोणतीही  करदर वाढ नसलेले पर्यावरणपुरक  समाजातील  सर्व घटकांचे (दिव्यांग, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, आदि) हॅप्पीनेस इंडेक्स संवर्धित करणारे ‘कल्याण-डोंबिवली महापालिका'चे सन २०२३-२४ चे २४९३.७१ कोटी जमा आणि १८४७.१७ कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक आणि महापालिकेचे सन २०२४-२५चे ३१८२.५३ कोटी जमा आणि ३१८२.२८ कोटी खर्चाचे तसेच २५ लक्ष रुपये शिल्लकेचे मुळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदु राणी जाखड यांनी २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केले.

महिला, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांचे हित लक्षात घेवून सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये दिव्यांग कल्याण योजना अंतर्गत महापालिका मार्फत दिव्यांगासाठी मासिक पेन्शन आणि विविध उपक्रम यासाठी सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून १२ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच महापालिका शिक्षण विभागांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्र सुरु करणे प्रस्तावित आहे. महापालिका परिक्षेत्रातील कार्यरत महिलांकरिता वस्तीगृह उभारणे प्रस्तावित असून, यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आरक्षण अंतर्गत प्राप्त झालेल्या जागांमध्ये यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमध्ये र्प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थींनीसाठी नीट, जेईई, एमपीएससी, युपीएससी, आदि स्पर्धा परीक्षांसाठी महिलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करुन त्याअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका अंतर्गत शहरातील निराधार-बेघर नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी २ निवारा केंद्र टिटवाळा आणि डोंबिवली येथे कार्यरत असून, त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली असून तिसरे निवारा केंद्र वि्ीलवाडी येथे प्रस्तावित आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कला, क्रीडा, आदि गुणांना वाव देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन संस्था नेमण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधांसह ५० सन्मान कट्टे उभारण्यासाठी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथी नागरिकांसाठी विविध योजना प्रस्तावित असून त्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मांडा-टिटवाळा आरक्षण क्रमांक-५४ या भूखंडावर हरितक्षेत्र विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये वयोवृध्द नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी शहरात लाकडांवर चालणाऱ्या स्मशानभूमींचे टप्प्याटप्प्याने विद्युत दाहिनीत रुपांतर करण्यात येणार आहेत. यामुळे वृक्षतोडीला आळा बसून हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. येत्या वर्षात मृत प्राणीमात्रांच्या अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी उभारणे आण त्याच्या आजुबाजुच्या परिसरात मियावाकी पध्दतीने हरितक्षेत्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

बारावे येथे आरक्षण क्रमांक-१५२ या भुखंडावर सुसज्ज बगीचा विकसित करण्यात येणार असून, या उद्यानात ऑटीझम व्हीलेज अशी अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील ऑटीझमग्रस्त मुलांना सर्व प्रकारच्या सुविधांसह सुसज्ज उद्यान उपलब्ध होईल. तसेच किड-झी या ठिकाणी अद्यावत सुविधांसह तयार होणार आहेत.

शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत महापालिकेस प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या रक्कमेमधून ५ उद्याने, प्रमुख इमारती, रुग्णालये याठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच जीव्हीपी पॉईंट बंद करण्याचे दृष्टीने देखील सुशोभिकरण करण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्व ९० फुट रस्त्यालगत आणि कल्याण पश्चिम वसंत व्हॅली परिसरात मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ तसेच गोलवली येथे सुसज्ज उद्यान विकसित करण्यात येणार आहे. बारावे येथे आरक्षण क्र-१४७ या भूखंडावर खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत सुभाष मैदान येथे बहुउद्देशिय इंनडोअर गेम हॉल उभारण्यात येणार असून, मैदानाचे कायापालट करण्यात येणार आहे.

डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील आरक्षण क्र.३७ या भूखंडावर २००० चौ.मी. क्षेत्रफळावर बास्केटबॉल, खो-खो, टेनिस कोर्ट, कबड्डी, आदि खेळांसाठी क्रीडासंकुल विकसित होणार आहे. महापालिका मुख्यालय, गीता हरकिसनदास रुग्णालय, मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक, गौरीपाडा लॅब, वसंत व्हॅली रुग्णालय शिक्षण मंडळ कार्यालय, अन्सारी रुग्णालय येथे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट असून त्यातून २८६ कि.वॅट वीजनिर्मिती होणार आहे. नवीन इमारतींवर विकासकांकडून ४ मे.वॅट क्षमतेची सौरऊर्जा संयत्रे उभारण्याचा मानस आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तलाव आणि डोंबिवलीतील निळजे येथील माऊली तलाव यांचे संवर्धन-पुनर्जीवन करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, आगामी वर्षात सदर तलाव नागरिकांसाठी खुले होतील.

दरम्यान, मुलभूत सोयी सुविधा, एमएमआरडीए, खासदार-आमदार निधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, शासन अनुदान अंतर्गत विविध कामे करण्यात येणार असून, त्यापोटी ४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकातील इतर तरतुदी...
तलाव सुशोभिकरण-संवर्धन - ४१कोटी.
स्मशानभूमी-अंत्यविधी स्थाने - महसुली ५ कोटी, भांडवली २.५० कोटी.
नाट्यगृहे (रंगमंदिर)/क्रीडा केंद्राची व्यवस्था - ९ कोटी.
उड्डाणपुल - ३० कोटी.
विद्युत व्यवस्था - महसुली ३५ कोटी, भांडवली १४ कोटी.
अग्निशमन - महसुली ९ कोटी, भांडवली २० कोटी.
रुणालये-दवाखाने - महसुली २९.०५ कोटी.
सार्वजनिक स्वच्छता-घनकचरा व्यवस्थापन - महसुली १४७ कोटी, भांडवली ८०.५० कोटी.
प्राथमिक शिक्षण - महसुली ८१ कोटी, भांडवली १.५० कोटी.
दुर्बल घटक, शहरी गरीब घटक - १५ कोटी महसुली, ३४ कोटी भांडवली.
महिला-बाल कल्याण कार्यक्रम - १२.११ कोटी.
दिव्यांग कल्याण-पुर्नवसन कार्यक्रम - १२.२५ कोटी.
क्रीडा-सांस्कृतिक - २ कोटी.
परिवहन व्यवस्था - ६६ कोटी.
पाणी पुरवठा - महसुली १५४.३० कोटी, भांडवली ४६१.४० कोटी.
जलनिःस्सारण व्यवस्था - महसुली २.५० कोटी, भांडवली ५ कोटी.
मलनिःस्सारण व्यवस्था - महसुली ३७.१० कोटी, भांडवली ४५ कोटी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगीच्या घटनेचा एपीएमसी प्रशासनाला विसर?