ठाणे महापालिका क्षेत्रातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु
ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासून सुरु करण्यात आले असून, सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे.
सदरचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉपटवेअर ॲप्लीकेशनद्वारे करण्यात येत आहे. यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून, याकामी २५० पर्यवेक्षक आणि सुमारे ४००० प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांचे अधिनस्त प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज पार पाडण्यात येणार आहे.
शासनाद्वारे महापालिकेने नियुक्त केलेले प्रगणक ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करणार आहेत. सदर सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
सदर सर्वेक्षण दरम्यान ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीमध्ये नागरिकांनी दिलेली माहिती नोंदविण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महापालिका मार्फत हेल्पलाईन सुविधा (८६५७८८७१०१) उपलब्ध करुन देण्यात आली असून, या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना असल्यास यावर नोंद करु शकणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य मागासवर्ग आयोग द्वारे सुरु असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.