ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भाजप आता बनलीय भ्रष्टाचारी जनता पार्टी
उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस अशी ओळख आता ‘भाजपा'ने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साजरे करायचे उद्योग ‘भाजपा'ने आणि या पक्षाच्या नेत्यांनी सुरु केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘सर्वहारा जन आंदोलन'च्या नेत्या उल्का महाजन यांनी उरण येथे केली.
उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकार इतके निर्दयी बनले आहे की, सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरीबीची रेषा ओलांडतो आहे, याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे उल्का महाजन म्हणाल्या.
तिरंग्याचा ज्यांनी तिरस्कार केला, स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी खोटे ठरवले ते आज घरावर तिरंगा सक्तीचा करत आहेत. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरला गेला आहे. लोकांना त्याचे महत्त्व कळते, ते ‘भाजपा'ने सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या १० वर्षात सरकारने केलेल्या कारभारचे सूत्र पाहिले तर देशात मनुस्मृती आणण्याचा या मंडळींचा कावा आहे. बनारस हिंदू विद्यापीठात मनुस्मृतीचे धडे दिले जात आहेत. तेव्हाही निवडणूक प्रत्येक भारतीयाने ‘संविधान'साठी की मनुस्मृतीसाठी तेे ठरवून टाकले पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले.
भूक वाढविणे सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखली आणण्यात आले. ते े करता करता शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आल्याचेही उल्का महाजन म्हणाल्या.
विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधले. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी सतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करुन दाखवावे, असे आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नापास पंतप्रधान आहेत, अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले.
धर्म वाचला पाहिजे; पण तो शेतकरी, कष्टकरी, कामगारांना जागवणारा धर्म वाचला पाहिजे. धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना बुडविणे हेच धर्माचे कर्तव्य असल्याचे पोलाड म्हणाले. ज्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना मान दिला जात नसेल तिथे आदिवासी आणि मागासवर्गीयांची किंमत कोण ठेवणार? असा सवाल महाजन त्यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले. पाहुण्याची ओळख प्रभाकर घरत यांनी तर आभार सत्यवान ठाकूर यांनी मानले.