थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पाणी जोडणी खंडित

तुर्भे येथील रेन्बो बिझनेस पार्कवर महापालिकेची कारवाई  

नवी मुंबई : थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करणे व पाणीपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला गती दिली आहे. १ लाख ६८ हजार ३१६ रुपये थकीत मालमत्ता कराची वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने हावरे बिल्डर अँड डेव्हलपर्स यांची तुर्भे येथील रेन्बो बिझनेस पार्क मधील मालमत्तांना सील ठोकण्यासोबतच या मालमत्तांच्या पाणी जोडणी  खंडित करण्याची कारवाई केली आहे.  

चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास ८०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याकरिता मालमत्ता कर विभागाने हजारो थकबाकीदारांना थकित कराचा भरणा करण्यासाठी नोटीसा बजावून थकीत कराची रक्कम न भरल्यास मालमत्ता सील करण्याच्या व पाणी जोडणी खंडित करण्यासारख्या कारवाई करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.  

नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱयांनी बुधवारी हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी तुर्भे सेक्टर-२४ येथील भूखंड क्रमांक ३३ वर उभारलेल्या रेन्बो बिझनेस पार्क मधील युनिट क्र. ०२१४, व ०२१५ या दोन्ही मालमत्ताधारकांकडून कराचा भरणा न झाल्याने प्रत्येकी ८४ हजार १५८ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी  त्यांचे पाणी जोडणी खंडित करण्याची कारवाई केली. अशाप्रकारे इतर थकबाकीदारांवर कारवाई होण्याआधीच संबंधितांनी थकीत कराचा भरणा महापालिकेकडे करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सन २०२५ मध्ये ठाण्यात मेट्रो धावणार-खा. राजन विचारे