ग्रामीण भागात खुलेआम गुटखा, पानमसाला विक्री
उरण : गुटखा, पान मसाला यासारख्या मानवी शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या अन्न पदार्थाच्या विक्रीवर महाराष्ट्रात २०१२ साली बंदी घालण्यात आली. मात्र, अजुनही कित्येक ठिकाणी छुप्या पध्दतीने गुटखा, पान मसाला विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. उरण तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा, पान मसाला विक्री करणाऱ्या टपरीधारकांवर कारवाई होत नसल्याने सदर दुकानदार बिनधास्त खुलेआम गुटखा, पानमसाल्याची विक्री करताना दिसत आहेत.
गुटखा, पानमसाला यांच्या सेवनाने मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहता राज्यात २०१२ साली ‘राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार'ने गुटखा बंदीचा कायदा लागू केला. या गुटख्याच्या व्यसनामध्ये शाळकरी मुले आणि तरुण पिढी मोठ्या प्रमाणात गुंतली होती. गुटखा बंदी कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन, गुटख्याची वाहतूक आणि विक्रीवर बंदी आणण्यात आली. सुरुवातीला राज्यात गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली. मात्र, सद्यस्थितीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उरण तालुक्यातील शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याचे दिसत आहे. कारवाईच्या भितीने शहरी भागात गुटखा, पान मसाला छुप्या पध्दतीने विकला जात आहे. मात्र, उरणच्या ग्रामीण भागात पोलीस प्रशासन, अन्न-औषध प्रशासन यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने खुलेआम गुटखा आणि घातक असा पानमसाला विक्री होत आहे.
खुलेआम विक्री होणाऱ्या अशा गुटख्यावर नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, अन्न-औषध प्रशासन विभागाने कायमची बंदी घालावी, अशी मागणी उरण परिसरातील नागरिकांकडून होत आहे. खुलेआम होणाऱ्या गुटखा, पान मसाला विक्रीमुळे शाळेत शिकणारी अल्पवयीन मुले देखील गुटखा आणि पानमसाल्या सारख्या आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांचे व्यसन करीत आहेत. गुटखा खाल्ल्याने कित्येकांना तोंडाचा कॅन्सर झाला असून या व्यसनापायी नाहक बळी गेल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत.
उरणच्या ग्रामीण भागात गुटखा खरेदीसाठी कित्येक नागरिक शहरातून येत असतात. गुटख्याची विक्री करणारे होलसेल विक्रेते ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना विक्रीसाठी खुलेआम माल पुरवित आहेत. अधिक पैसा मिळवण्याच्या लोभापाई टपरीधारक लोकांच्या जीवाशी खेळ करतानाच गुटख्याची दामदुप्पट दराने विक्री करीत आहेत.
अन्न-औषध प्रशासनाचे आणि पोलीस अधिकारी ग्रामीण भागात फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील गुटखा, पान मसाला विक्रेत्यांना रानच मोकळे झाले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या अनेक पानटपऱ्यांवर, दुकानात गुटखा, पान मसाल्याची विक्री खुलेआम होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे छुप्या आणि खुलेआम पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात असो कुणी चुकीचे कृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणारच.
-मारुती घोळसवाड, सहाय्यक आयुवत-अन्न-औषध प्रशासन.