एनआरआय पाणथळ जागेच्या पाण्याचा मार्ग मोकळा करा; अन्यथा पाण्याच्या मार्गात येणारे अडथळे नष्ट करू - आमदार गणेश नाईक यांचा इशारा

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील  एनआरआय गृहसंकुल डीपीएस शाळेजवळील पाणथळी जागेत येणारे खाडीचे पाणी बंद करण्यात आले आहे. या पाण्याचा मार्ग मोकळा करा, अन्यथा आम्ही  पाण्याच्या  मार्गात येणारे अडथळे  नष्ट करू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.

आमदार  नाईक यांनी २३ में रोजी या पाणथळ जागेचा पाहणी दौरा  केला.  माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, विशाल डोळस, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक जयंत हुदार, पर्यावरणप्रेमी विरेन गांधी, रेखा संखला, संदीप सरीन,  सिडकोचे मुख्य अभियंता  बायस, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वने आणि पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर म्हणतात. परंतु, सिडकोमधील काही स्वार्थी  अधिकाऱ्यांमुळे या ठिकाणच्या पर्यावरणाला नख लावण्याचा प्रयत्न होतो आहे. डीपीएस शाळेजवळील पाणथळी जागेमध्ये  खाडीपात्राचे पाणी नियमितपणे  भरते. या ठिकाणी जेटीसाठी बांधकाम केल्याने  पाणथळ जागेत येणारे खाडीचे पाणी भरणी करून बंद करण्यात आले. पाणी आटल्यामुळे परिणामी या ठिकाणी  येणाऱ्या फ्लेमिंगोची  संख्या कमालीची घटली आहे. या ठिकाणी उतरताना  पाणी नसल्याकारणाने  जमिनीवर आदळून काही फ्लेमिंगोंचा जीव देखील गेला आहे. वास्तविक हा सर्व भाग  खारफुटीचा भाग आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास नॅशनल ग्रीन  ट्रिब्युनलने आणि सर्वोच्च न्यायालयाने  मज्जाव केलेला आहे.

असे असताना कायदा धाब्यावर बसवून  या ठिकाणी अनावश्यक जेट्टीचे काम करताना खाडीमधून या पाणथळी जागेमध्ये  जाणाऱ्या पाण्याचा मार्ग हेतू पुरस्कर बुजविण्यात आला.  यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये  नवी मुंबईतील पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी येत्या पंधरा 15 दिवसात  या पाणथळ जागेत  खाडी पात्रातील  पाणी पुन्हा नियमित सुरू होईल, याकरिता  व्यवस्था करावी अन्यथा स्वतः पाण्याच्या मार्गातील अडथळे नष्ट केले जातील, असा इशारा लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी दिला.  महापालिका आणि सिडकोमधील बहुसंख्य अधिकारी प्रामाणिक आहेत मात्र काही अधिकारी स्वार्थी प्रवृत्तीचे आहेत.  येथील पाणथळ जागेत  येणारे खाडीपात्राचे पाणी बंद करून  हा भूखंड विकण्याचा घाट काही अधिकाऱ्यांनी  घातल्याचे समजते असा आरोपही त्यांनी केला. मात्र या शहरावर प्रेम करणारे आमच्यासह सर्व नागरिक हे होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डेब्रीज प्रतिबंधासाठी ‘ठाणे'च्या सर्व प्रवेशद्वारांवर लवकरच २४ तास गस्ती पथके