नवीन पनवेल मधील पाणीप्रश्न जटील
नवीन पनवेल : नवीन पनवेल सेक्टर-३,४, ८, ९, १०, ११परिसरात जागोजागी महानगर गॅस कंपनी द्वारे गॅस पाईपलाईन टाकण्याची कामे सुरु आहेत. नवीन पनवेल सेक्टर-११ मधील अरुणोदय क्लिनिक लगतच्या रस्त्यावर महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जेसीबीने खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे.
गॅस पाईपलाईन टाकताना पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे रस्त्याखालून जाणाऱ्या जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना नवीन पनवेल परिसरात वारंवार घडत आहेत. दोन महिन्यापूर्वी नवीन पनवेल सेक्टर-३ मधील निल रेसिडेंसी सोसायटी समोर जलवाहिनी फुटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. तसेच दहा महिन्यापूर्वी नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेसमोरील सिध्दविनायक सोसायटीसमोर रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. यामुळे नवीन पनवेल मधील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नवीन पनवेल मधील पाणीप्रश्न जटील झाला असून, पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवीन पनवेल मध्ये बऱ्याच भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सिडको आणि पनवेल महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे पाईपलाइन फुटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे नवीन पनवेल मधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. येत्या निवडणुकीत नवीन पनवेल मधील पाणी प्रश्न चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.