थर्टीफर्स्ट, नववर्ष स्वागत उत्साहात साजरे

‘ड्रँक ॲन्ड ड्राईव्ह' मोहिमेत २३६ तळीराम पोलिसांच्या ताब्यात 

नवी मुंबई : ‘थर्टीफर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी ‘थर्टीफर्स्ट'च्या निमित्ताने राबविलेल्या ‘ड्रँक ॲन्ड ड्राईव्ह'च्या मोहिमेत मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे २३६ तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई कली आहे. त्याशिवाय पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर कारवाई कारवाई केली आहे. 

 याहीवर्षी नवी मुंबईकरानी मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात नववर्ष साजरा केला. ‘थर्टीफर्स्ट'च्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत अडीच हजारापेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. तसेच महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक, सिग्नल, जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे शहरात ‘थर्टीफर्स्ट'च्या मध्यरात्री कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. नवी मुंबई पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी स्वतः ठिकठिकाणी असलेल्या पोलीस बंदोबस्त पॉईंटला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. थर्टीफर्स्ट आणि नववर्ष शांततेत साजरा झाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी ‘थर्टीफर्स्ट'च्या बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक आणि भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांची १ जानेवारी रोजी पहाटे पर्यत तपासणी केली. या तपासणीत यावर्षी २३६ तळीराम सापडल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. या कारवाई बरोबरच वाहतूक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीवरुन फिरणारे, सिट बेल्ट न लावता फिरणारे तसेच दुचाकीवरुन ट्रिपल सिट फिरणारे आदि वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपआयुवत काकडे यांनी सांगितले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी अंमली पदार्थाची विक्री करणा-यासह दोघे अटकेत