कंटेनर पलटी; ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

नवी मुंबई : जेएनपीटी येथून ठाणे-बेलापूर मार्गे भिवंडी येथे जाणारा मालवाहू कंटेनर १० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घणसोली रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपुलाच्या रस्ता दुभाजकावर उलटल्याची घटना घडली. या प्रकारामुळे ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने ऐन सकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रबाले वाहतूक पोलिसांनी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेल्या कंटेनरमधील माल दुसऱ्या वाहनात भरल्यानंतर अपघातग्रस्त कंटेनर बाजुला काढून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मात्र, या प्रकारामुळे ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला.  

या अपघातातील कंटेनर ट्रेलर १० एप्रिल रोजी पहाटे जेएनपीटी येथून माल भरुन भिवंडी येथे जात होता. पहाटेच्या सुमारास सदर कंटेनर ट्रेलर ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपुलावर चढत असताना, तो रस्ता दुभाजकावर पलटी झाला. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाल्याने ऐन सकाळच्या सुमारास ठाणे आणि मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या कोपरखैरणे पर्यंत रांगा लागल्या. या अपघातानंतर ठाणेच्या दिशेने जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या बाजुची एकच लेन उपलब्ध असल्याने वाहतूक पोलिसांनी या एका लेनवरुन सर्व वाहने सोडून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.  

तसेच वाहतूक पोलिसांनी बेलापूर तसेच महापे कडून ठाणे-मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एमआयडीसी मार्गे ठाणे तसेच मुंबईकडे सोडल्याने ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. सदर अपघातग्रस्त कंटेनरमध्ये १८ टन माल असल्यामुळे तसेच ट्रेलरच्या बॉडीला नुकसान झाल्यामुळे कंटनेर ट्रेलर बाजुला घेण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी अपघातग्रस्त कंटनेर मधील माल दुसऱ्या कंटनेरमध्ये शिपट केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर आणि कंटेनर बाजुला काढुन दुपारी २ वाजण्याच्या या मार्गावरील वाहतूक सुमारास सुरळीत केली. मात्र, या कालावधीत ठाणे, मुलुंडच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संजोग वाघेरे-पाटील यांची ‘शोभायात्रा'ला भेट