९ ऑगस्ट रोजी हजारो भूमीपुत्रांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण
विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार
पनवेल : ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'ने येत्या ९ ऑगस्ट रोजी अर्थात ऑगस्ट क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारने सदर ठराव त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करुन घ्यावा, अशी ‘कृती समिती'ची मागणी आहे.
या संदर्भात पनवेल मधील आगरी समाज मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात ३ ऑगस्ट रोजी ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'ची बैठक झाली. सदर बैठकीस ‘कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठठाकूर, जे. डी. तांडेल, अतुल दिबा पाटील, विनोद म्हात्रे, संतोष केणे, गजानन पाटील, सचिव राजेश गायकर, विजय गायकर, दीपक पाटील, शैलेश घाग, प्रताप पाटील, नितेश वैती, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, रवी वाडकर, करसन पाटील, आशिष घरत, आदि उपस्थित होते.
राज्य सरकार ‘दिबां'च्या नावासाठी सकारात्मक असल्याने नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास व्यक्त करुन येत्या ९ ऑगस्ट रोजी विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचे फलक लावण्याचे सदर बैठकीत ठरविण्यात आले. खारघर, चिंचपाडा आणि बंबावीपाडा उरण-बायपास रोड येथे सदर फलक लावण्यात येणार आहेत. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्व प्रमुख नेते आणि हजाराेंच्या संख्येने भूमीपुत्र उपस्थित राहणार असल्याचे ‘कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले.
बैठकीतील ठळक मुद्देः
नामकरण आंदोलनाचा पुढील भाग म्हणून येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी विमानतळाच्या क्षेत्रात ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण'चे फलक लावून त्यांचे अनावरण करणे. नामकरणाबाबत ‘कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, संतोष केणे यांची अधिवेशन काळात मुखमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा आढावा सादर केला. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २४ जून २०२३ रोजी देण्यात आलेल्या पत्रानुसार राज्य सरकारने भूमीपुत्रांची तीव्र जनभावना लक्षात घेता नामकरणाबाबत विधानसभेत संमत ठराव विना विलंब केंद्र सरकारकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली. नामकरण चळवळीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकरवी दाखल केलेले खटले आणि गुन्हे हे मागे घ्यावेत म्हणून शासन निर्णय झालेला आहे. यातील प्रलंबित प्रकरणी त्या-त्या परिक्षेत्रातील पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना भेटून सदरचे खटले आणि एफ.आय.आर. मागे घेण्याबाबत संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, ‘समिती'चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भेट घेतील. गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याविषयी झालेल्या शासन निर्णयावर अद्याप ‘सिडको'कडून होत नसलेल्या अंमलबजावणी संबंधी माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणे.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याच्या आणि संघर्षाची महती-प्रचारप्रभावित जिल्ह्यासह राज्य आणि देशस्तरावर व्हावी यासाठी नवी मुंबई पुनर्वसन संस्था आयोजित दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान चळवळरुपी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘कृती समिती'ने सहकार्य करणे.