पावसाळा कालावधीत विविध प्राधिकरणांनी परस्पर समन्वयाने काम करावे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे कार्यरत असून या सर्वांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असे सूचित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकासह इतर सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतर्क रहावे, अशी सूचना महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी केली आहे.

‘शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'चे अध्यक्ष म्हणून आयुक्त डॉ. शिंदे यांनी ‘समिती'च्या विशेष बैठकीत सर्व प्राधिकरणांच्या उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी केलेल्या पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगाही काढला.

याप्रसंगी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त तथा समिती सदस्य सचिव सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त चंद्रकांत तायडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष समिती सभागृहात तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस-वाहतूक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, मोबाईल प्रोव्हायडर, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लि., टीबीआयए, मच्छीमार संघटना, आदि विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका क्षेत्र समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास काही सखल भागात पाणी साचते. अशा साधारणतः १४ ठिकाणांची माहिती असून त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची आवश्यक त्या प्रमाणात आत्ताच तजवीज करून ठेवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिले.

यावर्षी साधारणतः १० जून पासून पावसाला सुरुवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाईची कामे त्वरित पूर्ण करुन घ्यावीत. विशेषत्वाने एमीएमसी मार्केट मधील नाले आणि गटारे सफाईची कामे तत्परतेने पूर्ण करुन घ्यावीत. पावसाळा कालावधीत भाजीपाला, फळे यांच्या कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लागेल याची विशेष काळजी घ्यावी. पदपथावर विक्रीस परवानगी देऊ नये, असे आयुवतांनी निर्देशित केले.  

रेल्वे प्लॅटफॉर्म, रुळ तसेच रुळांच्या बाजुला असलेले नाले यांची सफाई लगेचच पूर्ण करावी. त्याचप्रमाणे ‘रेल्वे'चे अंडरपास आणि सब-वेही स्वच्छ करुन घ्यावेत. तसेच ‘रेल्वे'ची उद्‌घोषणा प्रणाली तपासून घ्यावी, अशा सूचना सिडको आणि रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या. रेल्वे हद्दीत लागलेल्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीने करुन घ्यावे, असे सूचित करतानाच होर्डींगला ‘स्थानिक नियोजन प्राधिकरण'ची परवानगी घ्यायला हवी, अशाही सूचना आयुक्त डॉ. शिंदे यांनी केल्या. तसेच एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईवर संबंधित विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन लक्ष द्यावे. एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पडलेले डेब्रीज ड्रेनेजमध्ये येऊन पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही, याकडे ‘प्राधिकरण'ने लक्ष द्यावे. नवी मुंबईतील डेब्रीज पडण्याच्या संभाव्य स्थळांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.  

यावेळी पोलीस विभाग तसेच वाहतूक पोलीस विभाग यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेण्याबाबत आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला सूचना केल्या.

दरम्यान, पाहणी केलेल्या सर्व कामांवर त्रयस्थ परीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत ३ अधिकारी, कर्मचारी देऊन या पथकाने नेमून दिलेल्या विभागातील नाले आणि गटार सफाई, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती अशा बाबींची काटेकोर तपासणी करीत कामे व्यवस्थित झाल्याची खात्री करुन घ्यावी. तशा प्रकारचा अहवाल द्यावा, असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे असून त्यांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे. महापालिका मुख्यालयातील ‘तात्काळ कृती केंद्र'शी संपर्कात राहून काम करावे. नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी २७५६७०६०/ २७५६७०६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ढिसाळ नियोजनामुळे उरणमधील ग्रामपंचायतींचा कचरा प्रश्न ऐरणीवर