ठाण्यात निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक

ठाणे : सुमारे ५०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरुपात येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातही २० जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिकृती, मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव येथे महाआरती आणि दिपोत्सव तसेच ‘लेझर शो'च्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडले जाणार आहे. सदर संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी ‘शिवसेना'च्या माध्यमातून भव्य स्वरुपात राबविला जात आहे. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आणि करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरु आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीट देखील ठाण्यातून पाठविण्यात आली होती. सदर बाब प्रत्येक ठाणेकराच्या दृष्टीने अभिमानाची आहे, असे नरेश म्हस् यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.

 ठाण्यात देखील अयोध्यो येेथे होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेतच, ‘शिवसेना'च्या माध्यमातून २० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायं.५ वाजता श्री कौपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलाव पर्यत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक तद्‌नंतर दिपोत्सव तसेच मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगाने संपन्न होणार आहे. तसेच ठाण्याच्या विविध भागामध्ये सुशोभिकरण आणि विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरुपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव येथे ‘लेझर शो'च्या माध्यमातून श्रीराम चरित्र उलगडण्यात येणार आहे, असे जिल्हाप्रमुख म्हस्के म्हणाले.

मासुंदा तलावावर तरंगता रंगमंच, लेझर शो...
मासुंदा तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीराम गीतांचा कार्यक्रम तसेच प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे. ‘लेझर शो'च्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर आकर्षक आणि नेत्रदिपक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाणार आहे.
सदरचा एक उत्सवच साजरा होत असून यात ऐतिहासिक अविस्मरणीय क्षणाचे आपणही साक्षीदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. यामध्ये ठाण्यातील सर्व भाषिक नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होवून या सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत. मिरवणूक प्रेक्षणीय असणार असून यामध्ये विविध साहसी कला सादर केल्या जाणार आहे. या मिरवणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक सहभागी होणार आहेत. सर्वचजण या उत्सवाच्या तयारीला लागले असून एक भक्तीमय वातावरण ठाणे शहरात निर्माण झाले आहे. या आनंद सोहळ्यात प्रत्येक ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक सौ. मिनाक्षी शिंदे,  सौ. लता पाटील, ठाणे  उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, ठाणे शहर संघटक अशोक वैती, ठाणे शहर विधानसभा क्षेत्र संघटक हेमंत पवार, कोपरी पाचपाखाडी विधानसभा शहरप्रमुख राम रेपाळे, ओवळा माजिवडा विधानसभा शहर प्रमुख राजेंद्र फाटक विशेष परिश्रम घेत असल्याचेही  नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

 

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१९८४ सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली