ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

वाशी : देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वत्र प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.तर दुसरीकडे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीसाठी महायुती मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप मध्ये रस्सीखेच चालू असताना महाविकास आघाडी तर्फे विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृह मध्ये इंडीया (महाविकास) आघाडी तर्फे बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बुथ प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे महायुतीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन एकीकडे रस्सीखेच सुरु असताना ‘महाविकास आघाडी'ने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, रविंद्र मिर्लेकर, खासदार राजन विचारे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, मनोहर मढवी, श्याम कदम, रमाकांत म्हात्रे, राजु शिंदे, जी. एस. पाटील, सलुजाताई सुतार, रुपेश ठाकूर, राहुल म्हात्रे, अजय गुप्ता यांच्यासह ‘महाविकास आघाडी'चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजप आता बनलीय भ्रष्टाचारी जनता पार्टी