हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशावर किरकोळ कारणावरुन चौघा मारेक-यांचा जिवघेणा हल्ला

जखमी प्रवाशी एका हाताने झाला कायमचा अधु  

नवी मुंबई : सीबीडी ते नेरुळ दरम्यान लोकलने प्रवास करणा-या एका 32 वर्षीय प्रवाशाला लोकलमधील चौघा टार्गट तरुणांनी बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकुने हल्ला करुन त्याला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सदर प्रवासी गंभीर जखमी झाला असुन त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात चौकडी विरोधात मारहाणीसह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, लोकलच्या चाकाखाली सापडून राजेंद्रकुमारच्या हाताचा चेंदामेंदा झाल्याने एका हाताने तो आता कायमचा अधु झाला आहे.  

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव राजेंद्रकुमार लालजी दिवाकर (32) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील कोसेबी जिह्यातील आहे. सात दिवसापुर्वी तो आपल्या गावावरुन ऐरोली येथे राहणा-या भावाकडे लॉन्ड्रीच्या कामासाठी आला होता. राजेंद्रकुमारला उलवे सेक्टर-10 मधील केदारनाथ लाँन्ड्रीमध्ये काम मिळाल्याने सध्या तो त्याच काम करून राहत होता. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी लॉन्ड्रीचे काम बंद असल्याने राजेंद्रकुमार हा पनवेल येथे राहणा-या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला होता. मात्र नातेवाईकाची भेट न झाल्याने तो पुन्हा उलवे येथे जाण्यासाठी पनवेल येथून लोकलने बेलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आला होता.  

परंतु बेलापूर येथुन उरणसाठी लोकल नसल्याने राजेंद्रकुमार याने नेरुळ रेल्वे स्थानकातून उरण लोकल पकडण्याचा विचार केला. त्यासाठी तो पनवेल सीएसएमटी लोकल पकडण्यासाठी गेला असताना लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या चार टार्गट तरुणांनी राजेंद्रकुमारला लोकलमध्ये चढु न देता त्याला ढकलुन दिले. परंतु लोकल सुटण्याच्या तयारीत असल्याने राजेंद्रकुमारने चारही तरुणांना तुम्ही मला अडवणारे कोण? असे बोलुन त्यांचे काही एक न ऐकता त्याने लोकलच्या डब्यात जबरदस्ती प्रवेश केला.  त्यामुळे संतफ्त झालेल्या चारही तरुणांनी राजेंद्रकुमारला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यापैकी एकाने चाकु काढुन त्याच्या गालावर वार केले. त्यानंतर त्याच्या पाठीत चाकु खुपसून त्याला गंभीर जखमी केले.  

यावेळी जखमी राजेंद्रकुमार याने चौघा मारेकऱयांची माफी मागीतल्यानंतर देखील चौघा मारेकऱयांनी राजेंद्रकुमारला मारहाण करत त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने धावत्या लोकलमधुन खाली ढकलून दिले. त्यामुळे राजेंद्रकुमार हा गंभीर जखमी होऊन खाली पडला असताना, काही प्रवाशांनी त्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी राजेंद्रकुमार पडलेल्या ठिकाणी धाव घेऊन त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजेंद्रकुमार याला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी चौघा मारेकऱयांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

लोकलच्या चाकाखाली राजेंद्रकुमारच्या हाताचा झाला चेंदामेंदा  
या घटनेतील चौघा मारेकऱ्यांनी राजेंद्रकुमारला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्यानंतर त्याचा उजवा हात लोकलच्या चाकाखाली आल्याने त्याच्या हाताचा चेंदामेंदा झाला आहे. तसेच त्याच्या पायाच्या नडगीत फ्रॅक्चर झाला आहे. सदर लुटारुंनी त्याच्या पाठीमध्ये चाकु खुपसल्याने चाकुची खोलवर जखम झाली आहे. तसेच त्याच्या गालावर देखील चाकुची जखम झाली आहे. सध्या राजेंद्रकुमार याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

लोकलमधील कुणीही प्रवाशी बचावासाठी पुढे आले नाहीत
या घटनेतील जखमी राजेंद्रकुमारला लोकलमध्ये चौघे तरुण बेदम मारहाण करत असताना, तसेच त्याच्यावर चाकुने वार करत असताना, सदर लोकलच्या डब्यामध्ये अनेक प्रवासी उपस्थित होते. यावेळी एकही प्रवासी राजेंद्रकुमारला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. चौघा मारेकऱ्यांनी राजेंद्रकुमारला धावत्या लोकलमधून ढकलुन देताना, सुद्धा प्रवाशी घाबरुन पुढे आले नाहीत.   

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोट्यवधींच्या बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा पर्दाफाश