‘दहावी बोर्ड'चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९५.८१ टक्के

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'तर्फे मार्च २४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात आला. ‘दहावी बोर्ड'च्या परीक्षेत  यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल आला आहे. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'कडून ‘पत्रकार परिषद'द्वारे राज्याची दहावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.६५ टक्क्यांनी अधिक लागला आहे, अशी माहिती ‘मंडळ'चे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमधून १५ लाख ६० हजार १५४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. यापैकी प्रत्यक्षात १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी ९५.८१ टक्के इतकी आहे.

यंदा दहावीची परीक्षा एकूण ८ भाषांमधून घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ७२ विषय होते, त्यापैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. दहावी परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. या परीक्षेत ९७.२१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली.
 
विभाग निहाय निकालः
पुणे - ९६.४४ टक्के
नागपूर - ९४.७३ टक्के
संभाजीनगर - ९५.१९ टक्के
मुंबई - ९५.८३ टक्के
कोल्हापूर - ९७.४५ टक्के
अमरावती - ९५.५८ टक्के
नाशिक - ९५.२८ टक्के
लातूर - ९५.२७ टक्के
कोकण - ९९.०१ टक्के

‘दहावी'मध्ये ५.३१ विद्यार्थ्यांना डिस्टींशन; ३.१४ लाख विद्यार्थी काठावर पास

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'तर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत ५ लाख ५८ हजार ०२१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह (७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक) गुण मिळवले. तर ५ लाख ३१ हजार ८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय ३ लाख १४ हजार ८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
निकालाची वैशिष्ट्येः

 २५,७७० पुनर्परीक्षार्थी अर्थात रिपीटर्स दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा नशीब आजमवत होते. यापैकी २५,३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२,९५८ (५१.१६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावीच्या परीक्षेला यंदा बाहेरुन बसलेले (१७ नंबर फॉर्म) २५,८९४ विद्यार्थी बसले होते. यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची सदर टक्केवारी ८०.४२ टक्के आहे.

नियमित, खासगी, दिव्यांग असे सगळे विद्यार्थी मिळून यंदा १६,२१,००० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५,१७,८०२ (९४.८६ टक्के) विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.

एकूण ९,०७८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८,४६५ (९३.2५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नमुंमपा विद्यार्थ्यांचे एसएससी परीक्षेत उज्वल यश