ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘ग्रँड सेंट्रल पार्क'चे उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वात मोठ्या ‘ग्रँड सेंट्रल पार्क'चे लोकार्पण उद्या ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
कोलशेत येथे कल्पतरु पार्क सिटीमध्ये सुमारे २०.५ एकरवर तयार करण्यात आलेले ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेकरांसाठी खुले करण्यात येणार आहे. या उद्यानात सुमारे ३५०० विविध प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी सदर उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यामध्ये मुघल, चिनी, मोरोक्कन आणि जपानी अशा चार पध्दतीच्या संकल्पनेवर आधारित उद्यानेही आहेत. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगींग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटींग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट अशा सुविधाही या उद्यानात आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
याच परिसरात मोठे ॲम्पी थिएटर, कॅफेटेरीया, प्रसाधनगृहे यांची व्यवस्था आहे. शाळांच्या सहली, पर्यवरणविषयक सहलींचे आयोजन करण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करता येणार आहे. सदर उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे जतन करण्यात आली असून नवीन वृक्षारोपणही करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांअंतर्गत उद्यान विकसित करुन घेतले आहे.
५ फेब्रुवारी रोजी माध्यम प्रतिनिधींसाठी सदर उद्यानाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय भौईर, उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती, आदि उपस्थित होते.
‘ग्रँड सेंट्रल पार्क'ची वैशिष्ट्येः
२०.५ एकरवर पार्क वरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान
उद्यानात पक्षी, फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्ती जातींचा अधिवास
३५०० पेक्षा जास्त झाडे
न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा
चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा
मोरोक्कन, चिनी, जपानी, मुघल रचनांनी प्रेरीत संकल्पना उद्याने
सर्वात मोठी खुली-हरित जागा
सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध मनोरंजनाच्या संधी
१ ट्री हाऊस, ३ एकरांचा विस्तीर्ण तलाव, स्केटिंग पार्क यांचा समावेश.