ग्राहकाने चलाखीने केलेली ८ लाखांची वीज चोरी उघड
नवी मुंबई : वीज चोरी पकडली जाऊ नये यासाठी करावे गावातील ग्राहकाने शक्कल लावून फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच दडवल्याची बाब उघड झाली आहे. ‘महावितरण'च्या नेरुळ विभागातील कर्मचाऱ्यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदरचा स्विच शोधून काढत या ग्राहकाने चलाखीने केलेली वीज चोरी पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्राहकाने सदर चेंजओव्हर स्विचच्या माध्यमातून ४ एसींचा वापर करुन ‘महावितरण'ची तब्बल ८२१ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
‘महावितरण'च्या नेरुळ उपविभागातील शाखा अभियंता आशिष इंगळे अनेक दिवसांपासून नेरुळ मधील संशयित ग्राहकाच्या वीज वापरावर लक्ष ठेवून होते. सदर बाब त्यांनी नेरुळ उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी २ पथके करावे गावामध्ये राहणाऱ्या संशयित ग्राहकाच्या घरी पाठवण्यात आले. यावेळी अभियंता अविनाश आभाळे, कृष्णात पाटील आणि सारिका अष्टनकर यांनी सागर पाटील, प्रवीण दानव आणि महिला कर्मचारी स्वाती लाड या टीमसोबत दीड तास प्रयत्नांची पराकाष्ठा करुन सदर ग्राहकाने फोटो फ्रेमच्या मागील बाजुस दडवून ठेवलेला स्विच शोधून काढला.
वीज चोर ग्राहकाने सदर चेंज ओव्हर स्विचच्या त्यामाध्यमातून ४ एसींचा वापर केल्याचे आढळून आले. या माध्यमातून सदर ग्राहकाने ८.२१ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शाखा अभियंता आशिष इंगळे यांनी सदर ग्राहकाकडून ८.२१ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
करावे गावातील ग्राहकाने चलाखीने केलेली वीज चोरी पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विनायक बुधवंत आणि त्यांच्या टीमचे ‘महावितरण'च्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे आणि वाशी मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.