मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचे दुसरे सत्र संपन्न
सामाजिक संस्थांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडविणार -आयुवत अभिजीत बांगर
ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना शहर विकासाच्या दृष्टीकोनातून ठाणेकरांच्या शहराविषयीच्या सूचनांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरु केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचे दुसरे सत्र नुकतेच ४ जानेवारी रोजी पार पडले. या सत्रात ठाण्यातील विविध सेवाभावी (अशासकीय) संस्थाच्या प्रतिनिधींकडून नागरिक म्हणून शहराविषयी असलेल्या अपेक्षा यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाणून घेतल्या. घरकाम करणाऱ्यां महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर, नाका कामगार, वृध्दाश्रमासाठी जागा, कचरावेचक महिला तसेच किन्नर समुहासाठी रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. तसेच चर्चासत्रात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दयांवर विचारविनिमय करुन निश्चितच मार्ग काढण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर चर्चासत्रात महापालिका उपायुक्त वर्षा दिक्षीत, ‘स्त्री मुवती संघटना'च्या संध्या डोंगरे, नीती फाऊंडेशनच्या मोफत अन्नसेवा देणाऱ्या अर्चना मार्गी, ‘रोटी बँक'च्या मनिषा पाटील, ‘जयश्री फाऊंडेशन'चे हरिशभाई गोगरी, वुमन्स वेल्फेअर फाऊंडशेन, शहरी बेघर निवारा केंद्राच्या मीनाक्षी उज्जैनकर, ‘महिला बचत गट कोअर ग्रुप'च्या कुंदा घनवटे, कचरावेचक महिलांसाठी काम करणाऱ्या सविता बालटकर, कचरावेचक महिला मंगल प्रधान, सामाजिक कार्यकर्त्यां लक्ष्मीछाया काटे, किन्नर समूहाच्या अमृता सिंग, रेश्मा कांबळे, आदि सहभागी झाले होते.
ठाणे शहरात नाका कामगारांची संख्या मोठी असून नाक्यानाक्यावर या कामगारांसाठी शेड उभारण्यात यावी. तसेच सदर ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे. घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरासाठी जागा उपलब्ध करुन देणे. शहरात ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने सेपटी किट उपलब्ध करावीत. सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याबाबतचे मुद्दे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीछाया काटे यांनी उपस्थित केले. याबाबत ज्या ठिकाणी बांधकामे सुरु आहेत त्या साईटची यादी घेवून आपण त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करावी असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
जयश्री फाऊंडेशन गरीब गरजू लोकांना जेवण पुरविते, त्यांनी आजी आजोबांसाठी शाळा सुरु केली आहे. यासाठी आवश्यक असलेली जागा महापालिकेच्या माध्यमातून द्यावी, असे माधुरी पाटील यांनी नमूद केली. तसेच या शाळा शहरातील विविध भागात सुरू केल्यास ज्येष्ठ नागरिकांची शिकण्याची सुप्त इच्छा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. समाजातील उपेक्षितांचा विकास व्हावा यासाठी स्वयंसेवक नेमून विविध शाळांच्या माध्यमातून काम केल्यास त्याचा फायदा समाजाला होईल आणि उपेक्षित मुलांच्या समस्याही इतरांना समजतील, असेही त्यांनी नमूद केले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे. गृहसंकुलांतील दैनंदिन कचरा जमा करण्यासाठी कचरावेचक महिलांना नियुक्त करण्यात याव्यात जेणेकरुन त्यांना यामाध्यमातून रोजगार निमिती होईल. एकत्रित केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन यामधून भंगार स्वरुपात असलेले साहित्य वेगळे केले जाईल, या माध्यमातून देखील त्यांना उत्त्पन्न मिळू शकेल. यासाठी कचरावेचक महिलांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच प्रती घर ठराविक रक्कम सोसायट्यांना ठरवून दिल्यास या माध्यमातून त्यांना हक्काचा रोजगार मिळून त्याचा भार महापालिकेवर पडणार नाही, असे सविता वालटकर यांनी सांगितले. तर कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
समाजातील किन्नर घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविली गेली पाहिजे. सदर समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची निश्चित अशी नोंदणी नाही या मंडळीना रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच स्वयंरोजगारासाठी काही कर्ज आवश्यक असल्यास बँकामार्फत अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध होईल यासाठी महापालिकेने मदत करावी, अशी मागणी ‘किन्नर समुह'च्या अमृता सिंग आणि रेश्मा कांबळे यांनी केली.
शहरातंर्गत सार्वजनिक ठिकाणी अनेक बेघर असल्याचे दिसून येतात. यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने बेघर शहरी निवारा केंद्र सुरु केले असून सदरचे काम ‘वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन'च्या माध्यमातून करण्यात येते. सद्यस्थितीत अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आवश्यक आणि पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जागेची आवश्यकता आहे. तरी अशा स्वरुपाची निवारा केंद्रे शहराच्या इतर भागातही सुरु करण्याची मागणी मीनाक्षी उज्जैनकर यांनी केली.
महिलांचे सक्षमीकरण तसेच गरीब-गरजू महिलांना रोजगार उपल्बध व्हावा यासाठी महिला बचत गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. या बचत गटांच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू बनविल्या जातात. परंतु, योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याचे ज्ञान आणि माहिती नसल्यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात बचत गटांची प्रगती होत नाही . यासाठीही महापालिकेच्या माध्यमातून सहकार्य मिळावे, अशी मागणी कुंदा घनवटे यांनी केली.
दरम्यान, अशा प्रकारची बैठक महापालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. या माध्यमातून समाजाच्या गरजांबाबत सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली त्या बद्दल उपस्थित सर्व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.
बैठकीत उपस्थित सर्व संस्थांच्या प्रतिनिधींकडून मांडण्यात आलेल्या मुद्यांचा महापालिकेच्यावतीने विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बचतगटांना चालना देण्यासाठी एकाच प्रकारे उत्पादन करता वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन केले जाईल यावर भर देण्यात यावा. तसेच काही महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात यावे. किन्नराच्या नोंदणीसंदर्भात ‘शासन आपल्या दारी' या उपक्रमातंर्गत विशेष कार्यक्रम राबवून किन्नरांची नोंदणी करणे तसेच रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात येईल. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका.