महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
वाहतुकदारांचा संप मिटताच भाजीपाला आवक मध्ये वाढ
शेतमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान?
वाशी : नवीन हिट अँड रन कायद्यातील तरतूदींची अंमलबजावणी तूर्तास न करण्याची भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर वाहतुकदारांचा संप मिटताच वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे भाजीपाला दरात घसरण झाली असून, ४० % शेतमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन मोटार कायद्याविरोधात वाहतुकदारांनी १ जानेवारी पासून बंद पुकारला होता.त्यामुळे वाशी मधील एपीएमसी भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक कमी होऊन भाजीपाला दरात वाढ झाली होती. ट्रक चालकांच्या संपात परराज्यातील भाजीपाला आवक पुरती थांबली होती.मात्र, वाहतुकदारांनी २ जानेवारी रोजी रात्री संप मागे घेतल्याने ४ जानेवारी रोजी एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यांची विक्रमी अशी ८१० गाडी आवक झाली आहे. त्यामुळे तीन दिवस कमी आवक मुळे भाजीपाला दरात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, एपीएमसी भाजीपाला बाजारात भाजीपाला आवक वाढताच दरात २० ते २५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतमालाला उठाव नसल्याने एपीएमसी भाजीपाला बाजारातून फक्त ४८२ गाड्यांची जावक झाली होती. त्यामुळे आवक प्रमाणे जावक झाली नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल पडून राहिला. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, भाजीपाला नाशिवंत शेतमाल असल्याने दोन दिवसानंतर भाजीपाला विकला नाही गेला तर तो खराब होतो. परिणामी भाजीपाला फेकून द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता शेतकरी अनिल वऱ्हाडे यांनी वर्तविली.