ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम

ठाणे महानगरपालिका व इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स यांचा संयुक्त कार्यक्रम

ठाणे  :  दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल केले तरी आपण खूप आजारांना रोखू शकतो. त्याचीच माहिती देण्यासाठी देशभर विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही त्याची माहिती देण्यासाठी ठाणे महानगरपालिका व इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स यांनी संयुक्तपणे संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम हाती घेतला आहे.

          आपल्यासमोर जीवनशैलीशी निगडित आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना कसा करायचा याची माहिती शालेय स्तरावर पोहोचली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स यांनी पुढाकार घेऊन संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम आखला आहे. त्याला महापालिका सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या उपक्रमाचे उद्धघाटन करताना केले.

          महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे शिक्षण विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात महापालिका शाळेतील आठवी आणि नववी इयत्तेमधील विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम टप्प्याटप्प्याने पोहोचवला जाणार आहे.

          इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी या उपक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. गेल्या दहा ते पंधरा वर्षात लहान मुलांच्या, युवकांच्या आरोग्याचे चित्र खूप बदलले आहे.  हा बदल कशामुळे होतो आहे याचा शोध घेतल्यानंतर त्याची मुळे बदलती जीवनशैली, अन्न, राहणीमान यांच्यात असल्याचे दिसले. म्हणूनच थेट विद्यार्थ्यांशीच संवाद साधण्याचा निर्णय संस्थेने घेतला. विकसित भारताचे सूदृढ नागरिक बनवण्यासाठी हा संवाद आवश्यक असल्याचे मत डॉ. किंजवडेकर यांनी मांडले. याप्रसंगी, संस्थेचे महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ. रामगोपाल चेजरा, सहसचिव डॉ. परमानंद आंदनकर, उपायुक्त (शिक्षण) उमाकांत गायकवाड, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आदी उपस्थित होते.

           उद्घाटन समारंभानंतर, ठाणे महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. १३०, काजूवाडी व माध्यमिक शाळा क्र. ५, सावरकर नगर येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांशी बालरोगतज्ज्ञांनी विविध विषयांवर संवाद साधला. डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी पोषण आहार आणि जंकफूडबाबत जागरूकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. वैजयंती इंगवले यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यायामाची प्रात्यक्षिके दाखविली. तसेच, विद्यार्थ्यांकडून ही प्रात्यक्षिके करून घेतली. डॉ. संदिप केळकर यांनी मानसिक आरोग्याची गुरूकिल्ली यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिके दाखविली. तर, डॉ. ग्रिविता रायकर यांनी विद्यार्थ्यांना स्क्रीन टाईम, मोबाईल, टि.व्ही. यांचा अतिवापर, नियमित झोप यांच्याबद्दल माहिती दिली. या सत्राचे समन्वयन डॉ. अमृता बाविस्कर यांनी केले.

        उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी निरोगी आयुष्यासाठी 'जंकफूड ऐवजी हेल्दी फूड' अशी शपथ घेतली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत या कार्यक्रमात मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनानुसार आपल्या किमान १० मित्रमैत्रिणींना माहिती देण्याची ग्वाही दिली.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘बोर्ड'च्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेचा ६ जानेवारी रोजी शुभारंभ