एनआरआय क्षेत्रात ३ पलेमिंगो पक्षी मृत
नवी मुंबई : ‘नवी मुंबई पलेमिंगो सिटी'च्या इतिहासात प्रथमच १९ एप्रिल रोजी पहाटे काही गुलाबी पक्षी पामबीच मार्गावरुन फिरताना पर्यावरणवाद्यांना दिसले. त्याचवेळी एनआरआय सिग्नलवर पामबीचच्या सर्व्हिस रोडवर एका गुलाबी पक्षाला लोळताना पाहिले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तो पक्षी खाली कोसळला आणि मयत झाला, असे २२ वर्षीय सिनेमॅटोग्राफर आणि पक्षीप्रेमी हमराज खुराणा याने सांगितले.
यावेळी इतर कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही म्हणून खुराना याने पक्षाला बाजुला करत एनआरआय पोलिसांना सावध केले. सदर ‘हिट ॲन्ड रन'चे प्रकरण आहे आणि आजुबाजुच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पहाटे १.४५ च्या सुमारास घडलेली घटना रेकॉर्ड झालेली असावी, असे खुराणा याला वाटले. यानंतर पामबीच रस्त्यावर आणखी एक पलेमिंगो चालताना दिसल्याने खुराणा याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तर दुसरीकडे माजी नगरसेवक जाधव यांनी सीवुडस् एनआरआय परिसरात २ मृत पलेमिंगो पक्षी मृत झाल्याचे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पलेमिंगो त्यांच्या पाणथळ वस्तीतून बाहेर पडले आणि रस्त्यावर उतरले, ते विचित्र असल्याचे सांगत ‘नॅटकनेटवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी पर्यावरण विभागाकडून चौकशीची मागणी केली आहे. बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणाले की, पलेमिंगो रस्त्यावर उतरल्याचे मी पहिल्यांदाच ऐकले. ते विचलित किंवा खचून जाऊ शकतात. त्यामुळे निरीक्षणाअंती यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे, असे ‘बीएनएचएस'चे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणाले.
पलेमिंगो पक्षांचा डीपीएस लगतचा तलाव पूर्णपणे कोरडा झाला असून तेथे उतरणारे काही पक्षी अन्न मिळविण्यासाठी संघर्ष करु शकतात. एनआरआय पाणथळ जागा गलिच्छ असल्याने तेथे फारसे पलेमिंगो येत नाहीत. आम्ही ठाणे क्रीक पलेमिंगो अभयारण्य मधील भरतीच्या वेळी टी. एस. चाणक्य पाणथळ प्रदेशात हजारो पलेमिंगो उतरताना पाहतो आणि शेकडो पक्षीप्रेमी या परिसरात गर्दी करत असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
यासंदर्भात ‘नॅटकनेवट'ने पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेला डीपीएस पलेमिंगो तलाव सुपूर्द करण्यासाठी आणि जैवविविधता वाचवण्यासाठी ‘सिडको'शी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पर्यावरणप्रेमी रेखा सांखला यांनी पलेमिंगो पक्षांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला आहे. मोकळ्या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना वाहनधारकांनी सावधगिरी बाळगण्याचे सांखला यांनी आवाहन केले आहे. टी. एस. चाणक्य येथे सौर दिव्यांच्या पॅनेलची उभारणी करणाऱ्या महापालिकेने पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतर ते काढून टाकले. तेथील संरचनेचा ओल्या जमिनीवर पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो. ७ पलेमिंगो पक्षांचा मृत्यू झाल्यामुळे ‘सिडको'ला नेरुळ जेट्टी वरील एक भव्य साइन बोर्ड खाली पाडणे भाग पडले आहे.