वाजले निवडणुकीचे बिगुल; लोकसभा निवडणुकीची घोषणा

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वात मोठ्या ‘लोकशाही'च्या उत्सवाला येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. ‘केंद्रिय निवडणूक आयोग'चे मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी १६ मार्च रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे देशातील लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. याप्रसंगी निवडणूक आयुवत एस. एस. सिंह आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.

 मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी जाहीर केल्यानुसार देशात १९ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीत एकूण ७ टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड येथे होईल. तर ‘महाराष्ट्र'मध्ये २६ एप्रिल ते २५ मे पर्यंत ५ टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी असेल. दरम्यान, २०२४ वर्ष जगभरात निवडणुकांचे असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी केले आहे.

मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदार, वृध्द मतदार, तरुण मतदार, महिला आणि पुरुष मतदार किती? याची सविस्तर माहिती दिली. यावर्षी जगभरात सर्वत्र निवडणुकांचे पर्व सुरु आहे.  भारतीय निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असते.  देशात एकूण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. देशात १०.५० लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम, १.2 कोटी  प्रथम मतदार, ४८ हजार तृतीयपंथी, १०० वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार २ लाख, १.५ कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी असून १२ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक-२०२४ ची वैशिष्ट्ये म्हणजे फ्री-बिझवर निर्बंध असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता वाटेल तशा घोषणा करता येणार नाही. घोषणा करताना खर्च आणि आर्थिक तरतूद दाखवणारे राजकीय पक्षांना प्रतिवेदन सादर करावे लागणार आहे. १७ व्या वर्षी मतदार होण्यासाठी फॉर्म-६ भरुन ठेवण्याची सुविधा ‘आयोग'ने केली असल्याने १८ व्या वर्षी लगेच मतदान करता येणार असल्याचे आयुवत राजीव कुमार यांनी सांगितले.  

‘निवडणूक आयोग'कडून निवडणुकीत कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन दुप्पट केले आहे. तर दुसरीकडे  कुठे पैसा वाटप सुरु असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाकल्यानंतर मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरुन लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात ‘निवडणूक आयोग'ची टीम तिथे पोहोचेल. निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार ‘निवडणूक आयोग'ने केला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रुम असेल. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण ३०० मार्गदर्शक सूचना होत्या. आता त्याचे संकलन, रुपांतर २७ मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आले आहे. ‘निवडणूक आयोग'च्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणे देखील सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे नो-युवर कँडीडेट या ॲपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही ‘निवडणूक आयोग'ने योग्य ती पावले उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आयोग सज्ज आहे. निवडणूक प्रचारांवेळी आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल ‘आयोग'कडून घेण्यात आली आहे. स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश ‘निवडणूक आयोग'ने दिले आहेत. आमच्यासमोर निवडणुकीची तयारी करताना एकूण चार आव्हाने होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर होतं. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पध्दतीच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्य निवडणूक आयुवत राजीव कुमार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक टप्पाः
पहिला टप्पा   मतदान १९ एप्रिल २१ राज्य १०२ मतदारसंघ
दुसरा टप्पा मतदान २६ एप्रिल १३ राज्य ८९ मतदारसंघ
तिसरा टप्पा मतदान ७ मे १२ राज्य ९४ मतदारसंघ
चौथा टप्पा मतदान १३ मे १० राज्य ९६ मतदारसंघ
पाचवा टप्पा मतदान २० मे ८ राज्य ४९ मतदारसंघ
सहावा टप्पा मतदान २५ मे ७ राज्य ५७ मतदारसंघ
शेवटचा टप्पा मतदान १ जून ८ राज्य ५७ मतदारसंघ.

महाराष्ट्रातील मतदानः
टप्पा दिनांक मतदारसंघ
पहिला टप्पा १९ एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
दुसरा टप्पा २६ एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा ७ मे रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा,
रत्नागिरी-सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा १३ मे नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ,
पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
पाचवा टप्पा २० मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील ६ मतदारसंघ. 

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एक बार फिर से मोदी सरकार'ने नवी मुंबई मध्ये आचारसंहिता भंग?