‘अन्नपूर्णा परिवार'ची वार्षिक सभा संपन्न

नवी मुंबई : ‘अन्नपूर्णा परिवार'तर्फे नुकत्याच ३१ व्या ‘वार्षिक सभा'चे सीबीडी मधील वारकरी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सुमारे २५०० महिला उपस्थित होत्या.

‘अन्नपूर्णा परिवार' पुणे आणि मुंबई येथे कार्यरत असलेल्या महिला सक्षमीकरणासाठी ३१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६ संस्थांचा समूह आहे. गरीब महिलांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे सक्षमीकरण करणे, त्यांना आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि बालविकासासाठी सहाय्य करणे असे ‘अन्नपूर्णा परिवार'चे उद्दिष्ट आहे.

‘अन्नपूर्णा परिवार'ने सुमारे १३१ कोटींची छोटी कर्जे सन २०२३ या एका वर्षात गरीब महिलांना दिलेली असून ७५ कोटी रुपयांची बचत गोळा केलेली आहे. सदर कर्जे कोणत्याही तारणाशिवाय किंवा जामिनाशिवाय दिली जातात. तरीदेखील या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण १०० % आहे.

आरोग्य विमा विभागातर्फे ५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम ‘अन्नपूर्णा परिवार'मधील गरीब महिला आणि त्यांच्या कुटुंबांना आजारपण आणि मृत्युच्या प्रसंगी दिली गेली. ‘परिवार'तर्फे विद्यापूर्णा शैक्षणिक शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. गरीब विद्यार्थ्यांना यावर्षी २० लाख रुपयांचे शैक्षणिक सहाय्य ७८५ मुला-मुलींना दिले गेले. एकूण १.३५ लाख रुपये कष्टकरी महिला आणि त्यांची कुटुंबे ‘अन्नपूर्णा परिवार'चे सदस्य आहेत.

यावर्षी ‘अन्नपूर्णा'तर्फे त्यांच्या सभासदांना स्वतःचे घर बांधण्यासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. आता सभासद महिलांना त्यांच्या नावावर घर मिळणार आहे. घर आणि वस्ती या दोन्हींचा विकास व्हावा, असा त्यामागील उद्देश आहे.  ‘अन्नपूर्णा'द्वारे यापूर्वीपासूनच सभासदांना कर्जाचे वितरण ‘कॅशलेस' पध्दतीने केले जाते आहे, ज्यात ३५,००० रुपये ते १० लाखांपर्यंतची कर्जे कोणत्याही तारणाशिवाय दिली जात आहेत. म्हातारपणात सहाय्य मिळण्यासाठीच्या आधारपूर्णा पेन्शन योजनेचे आता ३५,००० सभासद झालेले असून सर्व सभासदांचा योजनेत समावेश करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती ‘अन्नपूर्णा'च्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी सदर कार्यक्रमात दिली.
‘अन्नपूर्णा'च्या सर्व सभासदांना त्यांच्या ‘अन्नपूर्णा'मधील मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींच्या (रिकरिंग डिपॉझिट) बचतींवर त्यांना उत्तम व्याज दर मिळत आहे, असे डॉ. सामंत म्हणाल्या.

 प्रमुख वक्ते हमीद दाभोळकर यांनी मानसिक आरोग्य आणि सामाजिक दृष्टिकोन याबद्दल महिलांनी मार्गदर्शन दिले. उपचार करताना बाबा, बुआ, सत्संग, अंगारे धुपारे करून फायदा होणार नाही. त्यांच्या या शब्दांचे ‘अन्नपूर्णा'च्या सभासदांनी स्वागतच केले.

विश्वस्त वृषाली मगदूम यांनीसध्याच्या सामाजिक स्थितीवर मार्गदर्शन केले. तर संस्थेचा आर्थिक अहवाल उज्वला वाघोले यांनी सादर केला.

या कार्यक्रमात भाजी व्यवसाय करणाऱ्या माया गायकवाड, कॉस्मेटिक दुकानदार निर्मला काळेबाग यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘अन्नपूर्णा'च्या काही सदस्यांना सर्वोत्तम उद्योजक, आदर्श माता, सकारात्मक सामाजिक बदलासाठी तसेच सर्वोत्तम गट असे पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन विश्वस्त रोहिणी देशपांडे यांनी केले. तर सिध्दी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एनएमएमटी'च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचे कलागुणदर्शन