चेन स्नॅचर त्रिकुट जेरबंद  

नवी मुंबई : वाशीतील जुहूगावात महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी खेचणाऱ्या तिघा लुटारुंना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. इमरान झाकीर शेख (२९), आकीब अन्वर सय्यद उर्फ झिप्रया (२६) आणि शिवराज लक्ष्मण चव्हाण उर्फ शिवा (२९) अशी या त्रिकुटाची नावे आहेत. या लुटारुंनी वाशी आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले २ गुन्हे उघडीस आले असून त्यांच्याडून दोन्ही गुन्ह्यातील अंदाजे ३ तोळे सोने आणि २ मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  

वाशी, सेवटर-११ येथील जुहूगावात राहणाऱ्या शोभा गवारे (४४) या गत आठवड्यात दुपारच्या सुमारास वाशी, सेक्टर-१४ येथून घरी येत असताना पाठीमागून मोटारसायकल वरुन आलेल्या दोघा लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले होते. मंगळसूत्र खेचताना सदर लुटारुंनी शोभा गवारे यांना खाली पाडल्यामुळे त्यांच्या गळ्याला आणि पाठीला जखमा झाल्या होत्या. वाशी पोलीस ठाण्यात याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली होती.

  या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच आरोपींच्या येण्या-जाण्याचाा मार्गावरील फुटेजचे निरीक्षण केले असता, सदर आरोपी नेरुळ परिसरात गेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने आणि तांत्रिक तपास करुन इमरान शेख, आकीब सय्यद, शिवराज चव्हाण या तिघांना नेरुळ जिमखाना परिसरातून ताब्यात घेतले. या तिघांच्या चौकशीत त्यांनी वाशी आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले चैन स्नॅचिंगचे २ गुन्हे उघडीस आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यातील ३ तोळे सोने आणि २ मोटारसायकल असा एकूण ३.८९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. -शशिकांत चांदेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-वाशी पोलीस ठाणे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मालमत्ता गुन्हे शाखेची  कारवाई